नंदुरबार : मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ पुरात गेला वाहून - पुढारी

नंदुरबार : मोठ्या भावाला वाचवताना लहान भाऊ पुरात गेला वाहून

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : दशक्रिया विधीसाठी तापी काठावर गेलेल्या परिवारातील मोठा मुलगा तोल जाऊन प्रवाहात पडला. त्याला वाचविण्यासाठी लहान भावाने उडी घेतली खरी दुर्दैवाने मात्र तोच लहान भाऊ वाहून गेला. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शहादा तालुक्यातील रवींद्र सामुद्रे यांच्या वडिलांचा आज (दि. १४) दशक्रिया विधी प्रकाशा येथील तापी नदीच्या काठावर पार पडला. त्याप्रसंगी रवींद्र यांचा मोठा मुलगा गौतम याचा अचानक तोल गेला आणि तापीच्या पुरात वाहू लागला. ते पाहून त्याचा लहान भाऊ राज याने ताबडतोब तापी नदीत उडी घेतली आणि मोठ्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला.

परंतु, प्रवाह वेगात असल्यामुळे तो पुढे वाहून गेला. दरम्यान, काठावरील मासेमारी करणारे तत्पर धावून आले आणि त्यांनी उड्या घेत दोघांचाही शोध घेतला. बऱ्याच अंतरावर गौतम याला वाचवण्यात त्यांना यश आले. परंतु, राज आढळला नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचे व नागरिकांचे पथक सायंकाळी उशीरापर्यंत दोघा भावंडांचा शोध घेत होते.

एका भावाला वाचवताना दुसऱ्या भावाचा जीव धोक्यात आला म्हणून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button