नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार | पुढारी

नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे स्वातंत्र्यलढ्यातील तसेच राष्ट्राच्या निर्मितीतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरणासाठी मंगळवारी (दि.15) जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गोल्फ क्लब मैदानावर चार दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवातून आदिवासींच्या रुढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि प्रचार करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा, लघुपट महोत्सव होणार असल्याचे आयुक्त डॉ. भारुड यांनी सांगितले. या महोत्सवासाठी राज्यातील 210 आदिवासी हस्तकलाकारांचे स्टॉल असणार आहे. तसेच 42 नृत्यपथके सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातील आदिवासी सांस्कृतिक मूल्याची आवड असणार्‍या नागरिकांसाठी पारंपरिक पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ, दागदागिने, वारली चित्रकला, गोडी चित्रकला, गवताच्या वस्तू, बांबूकाम, काष्टशिल्पे, धातूकाम, मातीकाम, पारंपरिक वनौषधी, लाकडी व लगद्याचे मुखवटे आदींचे भव्य प्रदर्शन व विक्री या महोत्सवाचे खास आकर्षण असेल, असे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला टीआरटीआयचे हंसराज सोनवणे, नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, अनुसूचित जमात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विनोद पाटील, किरण माळी, उपआयुक्त सुदर्शन नगरे आदी उपस्थित होते.

महोत्सवावर वादाचे सावट
जनजातीय गौरव दिवस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव निमंत्रण पत्रिकामध्ये बिरसा मुंडा यांचा केवळ फोटो असून, जयंती व त्यांचा उल्लेख नसल्याने आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, जनजातीय गौरव दिवस सुरू करून बिरसा मुंडा यांचा इतिहास पुसण्याचे काम मनुवादी सरकार करत आहे. जयंतीऐवजी जन्मोत्सव साजरा करण्याची गरज आहे. चुकीचा पायंडा पाडल्यास शासनाचा निषेध नोंदविला जाईल, असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button