नाशिक : सहा एकरांत पेरला भात, उगवले कुसळ | पुढारी

नाशिक : सहा एकरांत पेरला भात, उगवले कुसळ

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे येथील शेतकरी भात बियाण्यात झालेल्या भेसळीने दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली आहे. भात बियाण्यात भेसळ निघाल्याने फसवणूक झाल्याचा दावा शेतकर्‍यांनी केला आहे, तर अशा प्रकारे उगवलेला भात हा जमिनीत अगोदरच असलेला जंगली भात असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे याबाबत न्याय कसा मिळणार? असा सवाल शेतकर्‍यांनी केला आहे.

शंकर बोडके आणि राजाराम बोडके या दोन शेतकर्‍यांनी इंद्रायणी वाणाचे महाबीज बियाणे अधिकृत कृषी सेवा केंद्रातून विकत घेऊन ते पेरले. मात्र, प्रत्यक्ष पीक आल्यानंतर कुसळी भात उगवल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वर्षभर केलेले कष्ट, मशागत, भांडवली खर्च पाण्यात गेला असून, वर्षभर खाण्यासाठीदेखील तांदूळ मिळणार नाही, अशी स्थिती आहे. भाताच्या निसवणीनंतर वावरात आलेले भात हे इंद्रायणी नसून कुसळ असलेले भात आहे, हे लक्षात आल्यानंतर दोन्ही शेतकर्‍यांनी तालुका कृषी अधिकार्‍यांकडे धाव घेतली. कृषी खात्याने तक्रार निवारण समितीस पाचारण करत पाहणी केली. त्यानंतर या समितीने दिलेला अहवाल हाती पडला तेव्हा हसावे की रडावे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला.

उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र प्रतिनिधी, महाबीज सदस्य आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या संयुक्त समितीने पाहणी केली व इंद्रायणी पिकाच्या प्लॉटमध्ये 35 ते 40 टक्के कुसळी भात उगवल्याचा अहवाल दिला. तसेच नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ग्राहक पंचायतीकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुका कृषी खाते आणि पंचायत समिती कृषी विभागास शेतकर्‍यांच्या अडचणींबाबत गांभीर्य नसल्याचे यापूर्वीदेखील निदर्शनास आले आहे. बियाण्यात फसवणूक झालेल्या दोन्ही शेतकर्‍यांचे एकत्रितपणे सहा एकर भात क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये त्यांचे सरासरी 4 लाख रुपये किमतीचा 200 क्विंटल भात निकृष्ट दर्जाचा झाला आहे. त्यासाठी त्यांना जवळपास 3 लाखांपेक्षा अधिक खर्च आला आहे. या भाताला व्यापारी विकत घेणार नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या या शेतकर्‍यांना आता आधाराची गरज असताना त्यांना ग्राहक पंचायतीकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्याच वेळेस ग्राहक पंचायतीत अशा प्रकारची तक्रार सुनावणी किती वर्षे चालेल, याची शेतकर्‍यांना कल्पनाही नाही. अगोदरच लहरी निसर्ग बदलांनी हवालदिल झालेला बळीराजा ग्राहक न्यायलयात चकरा मारण्यासाठी वेळ कसा मिळवणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

भातात झालेली भेसळ मोठ्या प्रमाणात आहे. जनावरदेखील खाणार नाही, असे कुसळी भात विकले जाणार नाही. बियाण्यात झालेल्या फसवणुकीने आमचे 100 टक्के नुकसान झाले आहे. याबाबत शासनाच्या मदतीची गरज आहे.
– राजाराम बोडके,
बाधित शेतकरी, वेळुंजे

शेतकर्‍यांची तक्रार येताच तक्रार निवारण समितीने पाहणी केली आहे. या समितीत सदस्य असलेले विज्ञान केंद्र प्रतिनिधी यांनी दिलेल्या निष्कर्षाप्रमाणे अहवाल दिला आहे.
– सुनील विटणोर,
कृषी अधिकारी, पंचायत समिती

हेही वाचा :

Back to top button