नाशिक : बंदुकीचा धाक दाखवत ढकांबे येथे १७ लाखांचा दरोडा | पुढारी

नाशिक : बंदुकीचा धाक दाखवत ढकांबे येथे १७ लाखांचा दरोडा

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : आशेवाडी रस्त्यालगत रतन शिवाजी बोडके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून १७ लाख ३४ हजारांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी या दरोड्यामध्ये २८ तोळे सोने आणि साडे आठ लाख रूपये रोख असे एकूण १७ लाख ३४ हजार लंपास केले. ही घटना शुक्रवारी (दि.११) रात्री घडली.

ढकांबे येथे आशेवाडीला जाणार्‍या रस्त्यालगत मानोरी शिवारात रतन बोडके यांच्या मालकीची शिवकमल नावाची दोन मजली इमारत आहे. रात्री दीड ते तीन वाजेच्या सुमारास ३५ ते ४० वयोगटातील ६ दरोडेखोरांनी बंगल्याच्या खालच्या मजल्यावरील किचनच्या दरवाजाने बंगल्यात प्रवेश केला. हातात बंदुक व प्राणघातक शस्त्राच्या सहाय्याने धाक दाखवत ठार मारण्याची धमकी दिली. यावेळी घरातील कपाटात ठेवलेले २८ तोळे सोने, व साडे आठ लाख रुपये रोख रक्कम असे एकूण १७ लाख ३४ हजार ४०० रुपयांचा इतका ऐवज घेवून रतन बोडके यांच्या मालकीच्या क्रेटा कार (क्र. एमएच १५ एचवाय ३०५३) मध्ये बसून दरोडेखोर फरार झाले.

सदर कार ढकांबे फाट्यावरील वाडा हॉटेलजवळ बेवारस लावून दरोडेखोर फरार झाल्याचे आढळून आले आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक माधुरी कांगणे दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्‍वान पथकाला पाचारण करुन दरोडोखोरांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. अज्ञात दरोडेखोरांवर दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपअधिक्षक माधुरी कांगणे करीत आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button