नाशिक : रिक्त पदांनी ग्रामीण आरोग्यसेवा सलाईनवर
नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील तब्बल 121 पदे रिक्त आहेत. परिणामी, तालुक्यातील ग्रामीण आरोग्यसेवा अपुर्या मनुष्यबळामुळे आजारी पडली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कार्यरत कर्मचारी शक्य त्या पद्धतीने नागरी आरोग्याचा गाडा ओढत आहेत. सुमारे 55 टक्के पदे रिक्त असूनही उद्दिष्टपूर्तता करण्यासाठी अधिकार्यांना अतिरिक्त कार्यभार सांभाळत कसरत करावी लागत आहे. तरी, ती तोकडी पडून जनतेची परवड होत आहे.
मालेगाव तालुक्यात वडनेर खाकुर्डी, रावळगाव, करंजगव्हाण, चिखलओहोळ, मळगाव, सोनज, सौंदाणे, कळवाडी, निमगाव असे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे व 50 आरोग्य केंद्र आहेत. त्यासाठी मंजूर 253 पदांपैकी तब्बल 136 पदे रिक्त आहेत. या सर्व केंद्रांना स्वमालकीच्या इमारती आहेत. करंजगव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत निर्लेखित केली आहे. त्याठिकाणी नवीन इमारत बनविण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. तरी तालुक्याच्या आरोग्याचा गाडा फक्त 117 कर्मचारी ओढ आहेत. सुमारे 55 टक्के पदे रिक्त असून पंचायत समितीचा आरोग्य विभाग तोडक्या मनुष्यबळाच्या आधारे जनतेला आरोग्यसुविधा पुरवित आहे. आरोग्य कर्मचार्यांना नियमित बीसीजी, गोवर, हिपॅटायटिस बी, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, जीवनसत्व अ, जंतनाशक मोहीम, कोविड, राष्ट्रीय कार्यक्रम, कुटुंब कल्याण, शालेय आरोग्यतपासणी, अंगणवाडी, गरोदर माता, आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान, क्षयरोग, कुष्ठरोगींची नियमित तपासणी, असंसर्ग आजारांच्या तपासण्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आदी कामांचे नियोजन आरोग्य केंद्र व उपकेंद्रात नेहमी सुरू असते. तसेच या केंद्रांमध्ये विविध आजारांची नियमित तपासणी आणि औषधोपचारही केले जातात. सार्वजनिक लसीकरणासाठी नागरिकांना या आरोग्य यंत्रणेशिवाय अन्य पर्याय नाही. दरम्यान, आरोग्य विभागातच अपुरे मनुष्यबळ असतानाही कोरोना काळात मालेगाव महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला मदतीसाठी काही कर्मचारी देण्यात आले होते. नागरिकांना अचूक व तत्पर सेवा पुरविण्यासाठी शासनमान्य पदेच रिक्त असल्याने कार्यरत कर्मचार्यांवर कामाचा ताण वाढत आहेत. ग्रामीण रुग्णालयांबरोबरच शहरी शासकीय रुग्णालयातील रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी होत आहे.
रिक्त जागांसाठी वेळोवेळी वरिष्ठांकडे मागणी केलीय. त्याविषयी पाठपुरावा करण्यात येत आहे. कामाचे नियोजन करताना उपलब्ध कर्मचार्यांकडे अतिरिक्त कार्यभार दिला आहे. – डॉ. विनोद सोनवणे, तालुका आरोग्याधिकारी, पंचायत समिती, मालेगाव.
पदनिहाय अशी आहे स्थिती….
पद मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे
औषध निर्माण अधिकारी 10 8 2
कुष्ठरोग तंत्रज्ञ 1 – 1
आरोग्य पर्यवेक्षक 1 – 1
आरोग्यसेवक (पुरुष ) 58 29 29
आरोग्य सहायक (पुरुष) 11 10 1
आरोग्य सहायिका (महिला) 9 2 7
आरोग्यसेविका (महिला) 98 42 56
कनिष्ठ सहायक 10 6 4
परिचर 37 20 17
वाहनचालक 9 0 9
स्वीपर 9 0 9