नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन | पुढारी

नाशिक : सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याबाबत महानगरप्रमुख तिदमे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिडको : पुढारी वृत्तसेवा

सिडको कार्यालय सुरूच ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली. दरम्यान, सिडकोने ‘लिज होल्ड’ने दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी मिळेपर्यंत सिडको प्रशासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याची मागणी तिदमे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. रविवारी (दि.६) वर्षा बंगल्यावर त्यांनी भेट घेतली.

निवेदनात म्हटले आहे की, नवीन नाशिक येथे सिडकोने सदनिकाधारकांना ९९ वर्षे कराराने २५ हजार घरे विकली असून, अंदाजे ५ हजार वेगवेगळया वापरांचे भूखंड वाटप केलेले आहेत. तसेच वेगवेगळया ठिकाणी अंदाजे 1,500 टपरी भूखंडदेखील वाटप केलेली आहेत. सिडकोने ‘लिज होल्ड’ने दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ करून घरधारकांना संपूर्ण मालकी द्यावी, अशी सिडकोवासियांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. सिडकोवासियांचा कुटुंब विस्तार वाढल्याने घराचाही विस्तार वाढवावा लागतो. वाढीव बांधकाम करतांना या कामगार व अल्प उत्पन्न गटातील घरधारकांना कर्ज काढावे लागते. मात्र, लिज होल्ड मालमत्ता असल्याने अनेक बँका कर्ज देत नाहीत. काही वित्त संस्था याचा लाभ उठवत जास्त व्याजदराने कर्ज देऊन पिळवणूक करतात. “फ्री होल्ड’ मालमत्ता झाल्यास घरधारकाला घराचा पुनर्विकास करणे सुलभ होईल. तसेच, फ्री होल्डची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सिडको प्रशासकीय कार्यालयाचे कामकाज बंद करू नये, अशी विनंती तिदमे यांनी केली आहे. या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ सिडकोच्या अधिकाऱ्यांना सूचना देत कार्यालय नाशिकमध्येच सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. यावेळी शिवसेना सचिव संजय माशेलकर, नाशिक लोकसभा संपर्क प्रमुख जयंत साठे, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लक्ष्मी ताठे, महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, युवासेना जिल्हाप्रमुख योगेश म्हस्के, सदानंद नवले, ॲड. श्रद्धा जोशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button