नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम | पुढारी

नाशिक : पदवीधर मतदारसंघासाठी विशेष नोंदणी मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली आहे. त्यानुसार शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि.6) याप्रमाणे जिल्हाभरात दोनदिवसीय विशेष नोंदणी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीतही नोंदणी करता येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाचही जिल्ह्यांमध्ये मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. आयोगाच्या सूचनेनुसार नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि. 7) अंतिम मुदत आहे. परंतु, विभागातून आतापर्यंत सुमारे 35 हजार मतदार नोंदणी झाली आहे. नाशिक जिल्ह्यातून पाच हजारांच्या आसपास अर्ज आले आहेत. मतदार नोंदणीसाठी मिळणारा अल्प प्रतिसाद बघता, निवडणूक शाखेने शनिवार (दि. 5) आणि रविवार (दि.6) अशी दोन दिवस विशेष नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. नाशिक शहरातील 37 हून अधिक केंद्रांसह ग्रामीण भागांतही नोंदणीसाठी विशेष केंद्रे उभारली आहेत. दरम्यान, पदवीधरची प्रारूप मतदारयादी 23 नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाणार आहे. 9 डिसेंबरपर्यंत या यादीवर दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. नोंदणी करण्याचे आवाहन महसूल विभागाचे उपआयुक्त रमेश काळे यांनी केले आहे.

प्रसिद्धीनंतरही नोंदणीची मुभा…
नाशिक पदवीधर मतदारसंघाची अंतिम मतदारयादी 30 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम यादीच्या प्रसिद्धीपासून ते निवडणुकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत पदवीधरांना मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे, असे काळे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button