नाशिक : मालेगावला कारखान्याला आग | पुढारी

नाशिक : मालेगावला कारखान्याला आग

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील खडकी रोड द्याने शिवार येथे प्लास्टिकच्या दोन कारखान्यांना आग लागली. यात कारखान्यातील प्लास्टिक माल, यंत्रसामुग्री जळून सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 7 बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन दल जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

गोविंद शर्मा व विजय शर्मा यांच्या प्लास्टिक गिट्टी कारखान्याला शुक्रवार (दि.4) रात्री 10.30च्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार हे घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 बंबांनी 25 फेर्‍या केल्या, तर मनमाड, सटाणा व सोमा टोल वेचे बंबदेखील आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. सुमारे 5 तास सुरू असलेल्या या अग्नितांडवात सुदैवाने जीवित हानी झाली नसली, तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, मनपाचे अधिकारी सचिन महाले, राजू खैरनार तसेच माजी नगरसेवक मुश्तकिम डिग्निटी घटनास्थळी दाखल झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार यांच्यासह तुकाराम जाधव, जीवन महिरे, अमोल जाधव, जयेश सोनवणे, प्रदीप शिंदे, संजय गायकवाड, पीर मोहम्मद, शेख वासिफ, आबिद खान, शकील अहमद, जाकिर हाजी, सुधाकर अहिरे, राजेंद्र जाधव आदींनी प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी हे कारखाने प्रदूषण नियंत्रण मंडळाने नियमांचे उल्लंघन होत असल्याकारणाने सीलबंद केले होते. कारखाने सील केलेले असतानादेखील ते सुरूच कसे होते? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. अग्निशमन विभागाकडून यासंबंधीचा अहवाल पोलिस प्रशासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी दिली.

करोडोचे नुकसान वाचले…
आग लागलेल्या कारखान्यालगत पोपट वेताळ व बळीराम सोनवणे यांचे लूम कारखाने आहेत, तर एका बाजूस गणेशनगर झोपडपट्टी असून अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आल्याने सुदैवाने हे 90 लूम असलेले कारखाने व शेजारील झोपडपट्टी या आगीतून वाचली आहे. त्यामुळे करोडो रुपयांचे होणारे नुकसान तर टळलेच. मात्र, अनेक निष्पाप लोकांचा जीवदेखील वाचला आहे.

हेही वाचा:

Back to top button