सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश | पुढारी

सप्तशृंगगडावरील कुंड पुनरुज्जीवित करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सप्तशृंगगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी नैसर्गिक कुंड पुनरुज्जीवित करावे. गडावर येणार्‍या भाविकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उभारताना गावाच्या विकासासाठीचा अंतिम आराखडा पुढील महिन्याच्या बैठकीत सादर करावा, असे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी यंत्रणांना दिले.

सप्तशृंगगडावर ब वर्ग पर्यटन क्षेत्राअंतर्गत करण्यात येणार्‍या विकासकामांची आढावा बैठक गुरुवारी (दि. 3) पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सप्तशृंगगडावरील 108 कुंडांपैकी सध्या 40 कुंड अस्तित्वात आहेत. उर्वरित कुंडांचे पुनरुज्जीवित केल्यास गडावर पाणीटंचाई निवारणास हातभार लागेल. गडावर येणार्‍या भाविकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याने पर्यायी मार्ग उभारताना प्रदक्षिणा मार्ग खुला करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अधिकार्‍यांनी कार्यालयात बसून विकास आराखडा तयार करण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी, अशा कानपिचक्या भुसेंनी दिल्या. गडावर पाणी साठवणुकीसाठी तलाव बांधता येईल का? याची चाचपणी करावी. मंदिराच्या पायथ्याशी उभारण्यात येणार्‍या डोममुळे भाविकांसह दुकानदारांचे ऊन, पाऊस व वादळी वार्‍यापासून संरक्षण होईल या पद्धतीने नियोजन करावे. गावातील रस्त्यांची कामे करताना त्यात भुयारी गटार, महावितरणची भूमिगत तारा व नळ पाइपलाइनसाठी भविष्याची तरतूद करून कामे हाती घेण्याच्या सूचना भुसे यांनी केल्या. गडावर ब वर्ग विकास आराखड्याअंतर्गत रस्ते, पाणी, वीज अशा प्रकारची 13 कामांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीत. पण, अन्य कामांमध्ये वनविभागाच्या मान्यतेच्या अडचणी येत असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. त्यावर पालकमंत्र्यांनी राज्य व केंद्रस्तरावर या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला जिल्हा नियोजन, पाणीपुरवठा, महावितरण, बांधकाम व पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गप्पा मारायला बसलो नाही
बैठकीत विविध विभाग प्रस्तावित कामे व त्यावरील खर्चाचे आकडे सादर करत होते. त्याचवेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांच्याकडे खर्चाची जुनीच आकडेवारी उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यावर संतापलेल्या ना. दादा भुसे यांनी आपण गप्पा मारायला बसलो नाही. बैठकीपूर्वी तुम्हाला माहिती घेता आली नाही का? अशा शब्दांत जोशी यांची कानउघडणी केली.

बैठकीतील मुद्दे
गडावर मुलांसाठी बगिचा तयार करावा
वृक्षलागवडीला गती द्यावी
दरड प्रतिबंधात्मकतेसाठी तज्ज्ञांची मदत घेणार
बीओटी तत्त्वावर ठिकठिकाणी शौचालये उभारणी
विकासकामे करताना विभागांमध्ये समन्वय राखावा
अन्य देवस्थानांच्या ठिकाणी सुविधांची तपासणी करावी
प्रस्तावित चार रोप-वेच्या परवानगीबाबत योग्य निर्णय घेणार
गडावरील 3.5 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठणार

हेही वाचा :

Back to top button