नाशिक : सव्वा तोळ्याच्या नेकलेससह रोकड लंपास | पुढारी

नाशिक : सव्वा तोळ्याच्या नेकलेससह रोकड लंपास

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
दोडी खुर्द येथे घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सव्वा तोळा सोन्याच्या नेकलेससह लहान मुलीचे दागिने आणि 4 हजार रुपयांची रोकड असा ऐवज घेऊन पोबारा केला.

दोडी – दापूर रस्त्यावर दोडी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला कैलास सगळे यांनी नवीनच बंगला बांधला असून, अद्याप तेथे कोणी राहात नाही. चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर चोरट्यांनी प्रकाश साबळे यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळविला. साबळे यांच्या दरवाजाची कडी तोडून दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सव्वा तोळा सोन्याचा नेकलेस, लहान मुलीचे छोटे दागिने आणि 4 हजार रुपयांची रोकड असा ऐवज होता. तो घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. साबळे हे घराला कुलूप लावून कांदा लागवडीसाठी मळ्यात गेले होते. मुलगी घरी आल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. साबळे यांनी याबाबत नांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी या भागात पाहणी केली असता, चोरटे पसार झाले होते.

वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांमध्ये दहशत…
आता रात्रीच नव्हे, तर भर दिवसासुद्धा चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. या चोर्‍यांमुळे पोलिस यंत्रणेसमोर चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर भर दिवसाही शेतकरी वर्ग घाबरला आहे. शेतीची कामे करावी की नाही, की घरामध्येच थांबून राहावे अशी परिस्थिती झाली आहे. तेव्हा वरिष्ठ पातळीवरून उपाययोजना करून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

Back to top button