खा. हेमंत गोडसे : लोककवी वामनदादांचे स्मारक देशवंडीत उभारावे | पुढारी

खा. हेमंत गोडसे : लोककवी वामनदादांचे स्मारक देशवंडीत उभारावे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
दलित, कष्टकरी, कामगार, श्रमजीवी आणि मजूर यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, समाजात त्यांना माणूस म्हणून चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्याकडे बघण्याचा समाजाच्या द़ृष्टिकोनात बदल व्हावा यासाठी लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपले आयुष्य वेचले आहे. त्यांची जन्मभूमी देशवंडी गावात वामनदादांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.

स्व. वामनदादा कर्डक यांची जन्मभूमी सिन्नर तालुक्यातील देशवंडी गाव आहे.आजही या गावात स्वर्गीय कर्डक यांचा वाडावजा घर आहे. घरालगतच स्व. कर्डक यांचा एक छोटेखानी पुतळा आहे. कर्डक यांचा वाडा आणि पुतळ्याकडे शासनाचे लक्ष नसल्याने वाड्याची आणि पुतळ्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. वाडा मोडकळीस आलेला आहे. यातूनच देशवंडी गावातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी खासदार गोडसे यांची भेट घेत गावात कर्डक यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी केली होती. देशवंडी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार खासदार गोडसे यांनी मंत्रालयात जात पर्यटनमंत्री लोढा यांची भेट घेतली. कवितांच्या माध्यमातून स्व. वामनदादा कर्डक यांनी मागासवर्गीय समाजाच्या व्यथा शासनासमोर मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केलेले असल्याचे स्पष्ट करून कर्डक यांची जन्मभूमी असलेल्या देशवंडी गावात त्यांचे स्मारक व्हावे अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी ना. लोढा यांच्याकडे केली आहे. स्व. कर्डक यांच्या स्मारकासाठी खासदार गोडसे यांनी पुढाकार घेतल्याने देशवंडी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दलित, कष्टकर्‍यांसाठी वामनदादांनी आयुष्य वेचले…
दलित, कष्टकरी, मजूर या वर्गाचे प्रश्न सोडवण्यासाठी स्व. कर्डक यांनी त्यांचे अवघे आयुष्य वेचले वेचले आहे. दलित, कष्टकरी, कामगार, श्रमजीवी आणि मजुरांचे जीवन जगणे सुसाह्य व्हावे, यात लोककवी वामनदादा कर्डक यांच्या कवितांचा मोठा वाटा असल्याचे खासदार गोडसे यांनी ना. लोढा यांना सांगितले.

हेही वाचा:

Back to top button