Nashik : चाचपणीनंतर नाशिकला ‘टाटा’; एअरबस, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, आयटीच्या पाठपुराव्याला अपयश | पुढारी

Nashik : चाचपणीनंतर नाशिकला ‘टाटा’; एअरबस, इलेक्ट्रिक वाहन उद्योग, आयटीच्या पाठपुराव्याला अपयश

नाशिक : सतीश डोंगरे
वेदांता-फॉक्सकॉनपाठोपाठ टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, नाशिकमध्ये टाटा समूहाचा इलेक्ट्रिक वाहन उद्योग, संरक्षण खात्यातील साधनसामग्री उत्पादन प्रकल्प किंवा आयटी इंडस्ट्री यापैकी एक प्रकल्प नाशिकमध्ये येईल अशी 2019 मध्ये जोरदार चर्चा रंगली होती. टाटा समूहाच्या एका शिष्टमंडळाने यातील एका प्रकल्पासाठी इगतपुरीमध्ये जागेची पाहणीही केल्याची माहिती समोर आली होती. मात्र, यातील एकही प्रकल्प नाशिकमध्ये येऊ न शकल्याने नाशिकच्या उद्योग क्षेत्राला प्रकल्पाची चर्चा हुलकावणीप्रमाणे ठरली.

नाशिकमध्ये एचएएल ही विमान निर्मितीशी संबंधित कंपनी असल्याने, टाटा समूहाच्या एअरबस या प्रकल्पाला मोठा लाभ होईल म्हणून त्यावेळी स्थानिक उद्योजकांसह तत्कालिन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी थेट टाटा उद्योग समूहाचे रतन टाटा यांना पत्र लिहून नाशिकमध्ये हा प्रकल्प उभारावा  अशी गळ घातली होती. त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडेही स्थानिक उद्योजकांनी पत्रव्यवहार करून या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. मात्र, हा प्रकल्प नाशिकमध्ये येण्याची आशा धुसर झाल्यानंतर टाटा समूहाच्याच इलेक्ट्रिक वाहन उद्योग किंवा आयटी इंडस्ट्री या प्रकल्पासाठी नाशिकच्या उद्योजकांनी पुन्हा एकदा थेट रतन टाटा यांच्याकडेच पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. त्यातच टाटा ग्रुपच्या शिष्टमंडळाने इगतपुरीतील औद्योगिक वसाहतीत जागेची चाचपणी केल्याची माहिती समोर आल्यानंतर नाशिकमध्ये टाटा समूह एंट्री करेल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकमधील खेळती हवा, मुबलक पाणी, तंत्रशिक्षणाशी संबंधित संस्थांची मांदियाळी, जागांची उपलब्धता ही नाशिकची बलस्थाने ओळखून टाटा समूह नाशिकमध्ये येईल अशी अपेक्षा उद्योजकांना होती. विशेष बाब म्हणजे भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने रतन टाटा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नाशिकमध्ये प्रकल्प उभारणीसाठी गळ घातली होती. यावेळी शिष्टमंडळाने केलेल्या सादरीकरणाने प्रभावीत होऊन रतन टाटा यांनी आपले तज्ज्ञांचे पथक नाशिकची पाहणी करण्यासाठी पाठविणार असल्याची ग्वाही दिली होती. नाशिकमध्ये टाटा समूहाने एंट्री केल्यास बेरोजगारीच्या प्रश्न बर्‍यापैकी निकाली निघेल, असेही त्यावेळी स्वप्न रंगविले गेले. मात्र, हे स्वप्नरंजनच ठरल्याने आजही नाशिककरांना टाटा उद्योगाची प्रतीक्षा कायम आहे.

नाशिकमध्ये एचएल कंपनी असल्याने टाटा समूहाच्या विमान निर्मिती प्रकल्पाला मोठा हातभार लागू शकतो. शिवाय नाशिकची कनेक्टिव्हिटी लक्षात घेता हा प्रकल्प नाशिकमध्येच यावा यासाठी त्यावेळी आम्ही बरेच प्रयत्न केले होते. तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या माध्यमातून पत्रव्यवहारही केला होता. मात्र, त्यास यश आले नाही. त्यामुळे नाशिककरांना आजही टाटा समूहाच्या प्रकल्पाची प्रतीक्षा आहे.
– मनीष रावल, उद्योजक

 

नाशिकमध्ये टाटा ग्रुपने प्रकल्प उभारावा, याकरिता तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्याचबरोबर भाजप उद्योग आघाडीच्या शिष्टमंडळानेही टाटा यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. त्यावेळी टाटा ग्रुपचा प्रकल्प नाशिकमध्ये येईल, अशी चर्चाही रंगली होती. मात्र, एमआयडीसीकडे याबाबतची नोंद नाही. नाशिकची बलस्थाने पटवून दिल्यास टाटा ग्रुप अजूनही नाशिकमध्ये गुंतवणूक करू शकतो.
-नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

Back to top button