वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे | पुढारी

वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

वृद्धाश्रम ही संकल्पनाच आपल्या देशाला न शोभणारी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा अमृत महोत्सव व सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रम म्हणजेच मातृ-पितृ वंदनगौरव हा उपक्रम ज्येष्ठांप्रती आदर करण्याबरोबरच इतरांनादेखील प्रेरणादायी आहे. म्हणूनच सलादेबाबा ट्रस्टने मातृ-पितृ वंदन या राबवलेल्या उपक्रमाचे स्वागतच करायला हवे, असे गौरवोद्गार कोल्हापूरचे माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी काढले.

वडनेरभैरव येथे अमृतमहोत्सवी मातृ-पितृ वंदन सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्यातील वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या 75 व्यक्तींची प्रत्येक तालुक्यातून निवड करून देशाच्या अमृत महोत्सवानिमित्ताने संभाजीराजे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान कार्यक्रम सलादेबाबा ट्रस्टने आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उद्योजक गौतमबापू पाटील होते.

खा. युवराज संभाजीराजे यांनी कालभैरवनाथ मंदिर या ऐतिहासिक स्थळाला भेट देत अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कार्याची माहिती घेतली. ट्रस्टचे अध्यक्ष योगेश साळुंखे व सर्व विश्वस्तांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. ग्रामपंचायतच्या वतीने युवराज संभाजीराजे यांचा सन्मान सरपंच सुनील पाचोरकर आणि उपसरपंच योगेश साळुंखे यांनी केला.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृती नाही. तर भारताने जगाला मातृ पितृ देवो भव ही संकल्पना दिली आहे. देवाइतकेच आई-वडिलांना महत्त्व आपल्या संस्कृतीने दिलेले आहे. सलादेबाबा ट्रस्टच्या वतीने 75 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान होणे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. ज्येष्ठ नागरिक ही अनुभवाची खाण असून, ट्रस्टच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देतो, असे उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतमबापू पाटील यांनी भारतीय संस्कृतीचे पाईक म्हणून ट्रस्टच्या वतीने राजांच्या उपस्थितीत आई-वडिलांना वंदन करण्याचा आखलेला कार्यक्रम हा प्रेरणादायी असल्याचे मनोगत व्यक्त केले.

प्रमुख अतिथी म्हणून अमोल भालेराव, रामभाऊ भालेराव, एन. डी. माळी, पोपटराव पाचोरकर, नंदूशेठ जंगम, प्रमोद माळी, राजाभाऊ भालेराव, अनिल पवार, गणेश निंबाळकर, प्रभाकर भालेराव, शिवाजी शिंदे, भाऊसाहेब भालेराव, विक्रम सलादे, विलास भवर आदी उपस्थित होते. यावेळी वडनेर भैरवमधील आशा कर्मचाऱ्यांच्या वतीने संभाजीराजे यांना निवेदन देण्यात आले. कवी डॉक्टर कैलास सलादे आणि निकिता सलादे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिनकर रसाळ, मधुकर पाचोरकर, युवराज सगर, मनोहर पाटोळे, रामचंद्र मोरे, दत्ता शिंदे यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा :

Back to top button