नाशिक : आधारतीर्थ मधील अंधारात उधाणची रोषणाई….!! | पुढारी

नाशिक : आधारतीर्थ मधील अंधारात उधाणची रोषणाई....!!

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दीपोत्सव. मात्र आजही समाजातील अनेक घटक असे आहेतज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोड वर असलेल्या आधारतीर्थ या आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून उधाण युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या मुख्य संकल्पनेतून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नेहमीच समाजातल्या तळागाळात जाऊन आनंदाचे क्षण घेऊन पोहोचणाऱ्या उधाण सामाजिक संस्थेने यंदा या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांची दिवाळी गोड केली आहे.

दिवाळी हा सण गोड व्हावा म्हणून उधाण दरवर्षी वंचित घटकांसाठी उपक्रम राबवून शेकडो लोकांच्या जीवनातील तिमिरला प्रकाशाची वाट दिली आहे. याही वर्षी वायफळ खर्च न करता उधाण सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके व इतर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत विविध कार्यक्रक आणि उपक्रम याठिकाणी पार पाडले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला या आश्रमातील मुलांनी स्वागत गीत सादर करून उधाण मधील सर्व पदाधिकाऱ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले. त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र, कालभैरव अष्टक देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले. उधाण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या निमित्ताने विविध फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. या मुलांना शैक्षणिक हातभार लाभावा म्हणून जगदीश बोडके यांच्या संकल्पनेतून शैक्षणिक साहित्य वाटप देखील करण्यात आले. तसेच सर्वांनी एकत्र येत यावेळी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली. यावेळी या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाल्याचं बघायला मिळालं.

आमच्या आई वडिलांचे छत्र हरपलं तेव्हापासून आम्ही या ठिकाणीच राहतो दिवाळीनिमित्ताने उधाण च्या वतीने आमच्या जीवनातील दिवाळी प्रकाशमय व्हावी म्हणून करण्यात आलेला हा छोटासा प्रयत्न आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उधाण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके, सचिन गरुड, सिने अभिनेत्री संदेशा पाटील, वृषाली बोडके, धनश्री उपाध्ये, अमित थेटे पाटील, विजया दराडे, भूषण गायकवाड, मोनिष पारेख, विश्वजीत थेटे पाटील, तुषार हुल्लूळे, पवन शिलावट यांसह पदाधिकारी व आधारतीर्थ आश्रम अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button