आरोग्यदूत अभियान : स्वामी समर्थ केंद्रांतर्फे गोदास्वच्छता, वस्त्रदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार | पुढारी

आरोग्यदूत अभियान : स्वामी समर्थ केंद्रांतर्फे गोदास्वच्छता, वस्त्रदान, आरोग्य तपासणी, मोफत औषधोपचार

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत सक्रिय आरोग्यदूत अभियानाच्या वतीने गंगा-गोदावरी स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचारांचा संयुक्त कार्यक्रम हाती घेण्यात आला. जिल्हाभरातून आलेल्या सुमारे सव्वादोनशे महिला – पुरुष सेवेकर्‍यांनी यात सहभाग नोंदविला.

गुरुपीठाच्या वतीने चंद्रकांतदादा मोरे सहभागी झालेल्या या उपक्रमात माजी नगरसेविका वत्सला खैरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या प्रारंभाप्रसंगी सकाळी 8 ला रामकुंड परिसरात सर्व सेवेकरी एकत्र जमले होते. सेवेकर्‍यांनी रामकुंड ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंत स्वच्छता केली. यनिमित्त 125 गरजूंना वस्त्रवाटप करण्यात आले, तर 150 रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार करण्यात आला. यावेळी चंद्रकांतदादा मोरे आणि मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाबाबत चंद्रकांतदादा मोरे म्हणाले, एक दिवस स्वच्छता करून थांबायचे नाही. जगभरातील आठ हजारांहून अधिक केंद्रांच्या माध्यमातून वर्षभर सातत्याने हे अभियान राबावायचे आहे. या कार्यास गुरुपौर्णिमेपासून सुरुवात झाली. त्या दिवशी शेकडो सेवेकर्‍यांनी गोदामाता उगमस्थळी त्र्यंबकमध्ये हे अभियान राबवले. त्र्यंबक ते आंध्र प्रदेशामधील राजमहेंद्री म्हणजे गोदावरी जेथे समुद्रास मिळते, तेथपर्यंत त्या त्या भागातील सेवेकरी महिन्यातून एकदा हे अभियान राबवून स्वच्छता करतील, असेही ते म्हणाले. नदीप्रदूषण करण्यात निर्माल्याचाही वाटा असतो, यासाठी सेवेकर्‍यांनी घरी त्याचा वापर करावा, असे आवाहनही मोरे यांनी केले.

हेही वाचा:

Back to top button