धुळे हळहळलं : विजेच्या पोलला स्पर्श झाला अन् राष्ट्रीय खेळाडू कोसळला | पुढारी

धुळे हळहळलं : विजेच्या पोलला स्पर्श झाला अन् राष्ट्रीय खेळाडू कोसळला

धुळे : पुढारी वृत्तसेवा

घराजवळ असलेल्या पोल मध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धुळ्यात कुमार नगरात घडली आहे. याच भागात ही दुसरी घटना घडली असून वीज वितरण कंपनीने तातडीने नादुरुस्त वीज वाहिन्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

धुळे शहरातील कुमार नगर मध्ये राहणारा कुणाल प्रभाकर घरटे हा युवक जय हिंद महाविद्यालयातील विद्यार्थी असून तो बास्केटबॉल आणि फ्लोअर बॉल या खेळातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. घराजवळ असलेल्या पोलला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. ही बाब निदर्शनास आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याच्या हालचाली करण्यात आला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कुणाल हा त्याच्या परिवाराचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्या परिवारावर मोठे संकट कोसळले आहे. त्याच्या पार्थिवावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आहे. कुमार नगर परिसरात यापूर्वी अशाच पद्धतीने घराजवळ असलेल्या पोलला हात लागल्याने विजेच्या धक्क्याने एकाचे निधन झाल्याची घटना घडली होती. यावेळी देखील वीज वितरण कंपनीला सूचना करून देखील त्यांनी नादुरुस्त केबल दुरुस्तीचे काम पूर्णपणे केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात आज सोमवारी वीज वितरण कंपनी तसेच धुळे शहर पोलिसांना शिवसेनेच्या वतीने तक्रार देणार असल्याची माहिती नरेंद्र परदेशी आणि धीरज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान मयत कुणाल याने जयहिंद सिनियर कडून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नेतृत्व करत पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली येथे मैदान गाजवले आहे. अशा खेळाडूच्या अकस्मात मृत्यू मुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्यामागे आजोबा, आई, वडील बहीण असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button