जळगाव : हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या, पोलीस पतीला अटक - पुढारी

जळगाव : हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या, पोलीस पतीला अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या : हुंड्यासाठी छळ होत असल्याचे रामेश्वर कॉलनीत एका विवाहितेने (वय २३) आत्महत्या केली. विवाहितेस हुंड्यातील उर्वरित ३ लाख रूपये आणावे अशी मागणी पोलीस पतीकडून वारंवार होत असल्याच्या त्रासाला कंटाळून गुरूवारी (दि. ९ सप्टेंबर) रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पतीसह चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीराने गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलीस पतीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

हुंड्यासाठी छळल्याने विवाहितेची आत्महत्या

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रविण श्यामराव पाटील (रा. श्रीराम मंदिर चौक, मेहरूण) यांची लहान मुलगी कोमल हिचा विवाह १३ फेब्रुवारी २०१६ रोजी रामेश्वर कॉलनीतील चेतन अरविंद ढाकणे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. चेतन ढाकणे हा भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

हुंड्यासाठी २० लाख रूपये देण्याचे ठरले होते

लग्नाच्यावेळी हुंडा म्हणून २० लाख रूपये देण्याचे ठरले होते. परंतु, लग्न थाटामाटात झाल्याने प्रविण पाटील यांनी ७ लाख रूपये दिले होते. उर्वरित १३ लाख रूपयांपैकी १० लाख रूपये चार महिन्यांपूर्वी घर घेण्यासाठी दिले होते. हुंड्यातील ३ लाख रूपये देणे बाकी होते.

दरम्यान, उर्वरित हुंड्यातील ३ लाख रूपये आणावे यासाठी पती चेतन ढाकणे याने विवाहितेला मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ करत होता. यानंतर त्याने हुंड्याची रक्कम तातडीने आणावी यासाठी मंदाबाई अरविंद ढाकणे (सासू), प्रतिभा ज्ञानेश्वर घुगे (नणंद) आणि ज्ञानेश्वर विठ्ठल घुगे (जवाई) यांनी शिवीगाळ करण्यास सुरूवात केली होती.

यानंतर कोमलने हुंड्यासाठी छळ होत असल्याने ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यानंतर चेतन याने कोमलला जिल्हा रूग्णालयात दाखल केले आणि तिच्या कुटूबियांना ही माहिती सांगितली.

मुलीने आत्महत्या केल्याचे कळताच विवाहिता कोमलचे आई -वडिलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. मुलीचा मृतदेह पाहून त्यांनी हंबरडा फोडला. यात सासरच्या जांचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण पाटील यांनी केला.

वडिल प्रविण पाटील यांच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळीविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील संशयित आरोपी पती चेतन ढाकणे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button