गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत | पुढारी

गिरीश महाजन यांनी दिले महायुतीचे संकेत

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्ता समीकरणे सतत बदलत असून मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने महायुतीची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते, असे सांगून भाजप नेते तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत.

एका खासगी कार्यक्रमानिमित्त गिरीश महाजन शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. अर्थात मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आले असले तरी त्याकडे राजकारण म्हणून बघण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले. सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे महाजन म्हणाले.

मिलींद नार्वेकरांबाबत केला गौप्यस्फोट…

यावेळी महाजन यांनी उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतही मोठा गौप्यस्फोट केला. एमसीए निवडणुकीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असे सर्वपक्षीय एकत्र आले होते. या निवडणुकीच्या स्नेहभोजनानिमित्त एकनाथ शिंदे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या जवळीकतेची चर्चा रंगली होती. अशातच, मी जे ऐकतोय त्यानुसार मिलिंद नार्वेकर नाराज आहेत, असा खळबळजनक दावा महाजन यांनी केला. तसेच नार्वेकर यांचे गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगत शिवसेनेत कोण राहील कोण जाईल सांगता येत नाही, असेही वक्तव्य महाजन यांनी केले.

हेही वाचलंत का?

Back to top button