नाशिक : पाथरे परिसरात पाच तास पावसाचा धुमाकूळ | पुढारी

नाशिक : पाथरे परिसरात पाच तास पावसाचा धुमाकूळ

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
पाथरे आणि परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 20) पहाटे जवळपास पाच तास परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने परिसर जलमय झाला. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जमिनीत पाण्याची पातळी वाढली आहे.

त्यातच सध्या जोरदार पाऊस होत असल्यामुळे जमिनीत पाणी जिरत नाही. या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसले, तर अनेकांची घरे पाण्यात गेली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. पाथरे खुर्दच्या खालवाडी परिसरात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. रवि चिने यांच्या घराला तसेच त्यांच्या परिसरात तर पाण्याने वेढले आहे. हे पाणी साधारण दोन दिवस उतरणार नाही. यामुळे रोगराईही पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

सिन्नर,www.pudhari.news
पाथरे : परिसरात पुलावर आलेले पाणी.

समृद्धी महामार्गाचे व नाशिक शिर्डी महामार्गाचे कामे चालू असल्यामुळे या परिसरातील पाणी पाथरे गावात येते. अनेकांच्या शेतात काढणीला आलेला मका, सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. काही ठिकाणी मका पीक वाहून गेले. ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी शेतकर्‍यांची मागणी जोर धरू लागली आहे. परिसरात सातत्याने पाऊस चालू असून, शासकीय यंत्रणेने याकडे गांभीर्याने दखल घ्यावी, अशीही मागणी होत आहे.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी या परिसराचा पाहणी दौरा केला. शेतकरी, ग्रामस्थ यांच्याशी नुकसानीबद्दल चर्चा करून सर्कल, तलाठी यांना पंचनामे करण्यास सांगितले. यावेळी वारेगावच्या सरपंच मंदाकिनी दवंगे, पाथरे बुद्रुकच्या सरपंच सुजाता नरोडे, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णुपंत बेंडकुळे, ग्रामसेवक नितीन मेहेरखांब आदी उपस्थित होते.

सोंगणी केलेली पिके पाण्याखाली

कांदा, सोयाबीन, द्राक्षबागा, ऊस, भुईमूग, टोमॅटे, भाजीपाला यासारखे पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी सोयाबीन, मका यांची सोंगणी करून प्लास्टिकच्या कागदाखाली झाकून ठेवले होते. परंतु अतिपावसामुळे सोंगणी केलेली पिके पाण्याखाली गेली आहेत. या पाण्याचा जनावरांना त्रास होत आहे.अनेकांचे गोठे पाण्याने वेढलेले आहेत. त्यामुळे जनावरांना खाली बसताही येत नाही. शेतकर्‍यांना दूध पण काढता आले नाही. या पाण्यामुळे जनावरांना आजार होऊ शकतात. जनावरांचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button