Nashik : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही येणार नाशकात | पुढारी

Nashik : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही येणार नाशकात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी (दि. 21) नाशिकच्या (Nashik) दौर्‍यावर येत आहेत. राज्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर हे दोन्ही नेते प्रथमच एकत्रितरीत्या शहरात येत आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रकल्पाची घोषणा यावेळी दोघांकडून केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या जिल्हावासीयांचे लक्ष दौर्‍याकडे लागले आहे.

राज्यात जूनअखेरीस सत्ताबदल होऊन ना. शिंदे आणि ना. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले. गत तीन महिन्यांत मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन वेळेस जिल्ह्याचा दौरा केला. तर ना. फडणवीस हे एकदाच नाशिकमध्ये (Nashik) आले. दरम्यानच्या काळात गेल्या पंधरवड्यात या दोन्ही नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर येणे टाळले आहे. अशातच सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी (दि. 21) हे दोघेही नेते पहिल्यांदाच एकत्रितरीत्या नाशिकचा दौरा करत आहेत. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राजकीयदृष्टया या दौर्‍याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

ना. शिंदे व ना. फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या नाशिक विभागीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याशिवाय नाशिक साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या प्रारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर नाशिकमधील अतिवृष्टी, नाशिक-पुणे रेल्वेमार्ग, समृद्धी हायवे, नाशिक ड्रायपोर्ट यासह रखडलेल्या अन्य प्रकल्पांबाबत दोन्ही नेते आढावा घेतील, अशी शक्यता आहे. तसेच नाशिकसाठी मोठ्या प्रकल्पाची घोषणा होण्याचा कयास बांधला जात असल्याने दौर्‍याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दौर्‍यात कोणतीही उणिवा भासू नये यासाठी शिंदे गट आणि भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

प्रशासनाला दौर्‍याची प्रतीक्षा

नाशिकमध्ये येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या लवाजामा असणार आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजपकडून पक्षीयस्तरावर दौर्‍यासाठी जोमाने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी जिल्हा प्रशासनाला अधिकृत दौर्‍याची अद्यापही प्रतीक्षा कायम आहे. असे असले तरी प्रशासनाने त्यांच्या स्तरावर अधिकार्‍यांची जुळवाजुळव, बंदोबस्त व अन्य बाबींचा प्राथमिक स्तरावर आढावा सुरू केला आहे.

हेही वाचा :

Back to top button