एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर | पुढारी

एसटी प्रशासन : नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेमुळे उत्पन्नात साडेतीन कोटींची भर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी येथील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी नवरात्रोत्सवासह कोजागरी पौर्णिमेसाठी भाविकांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला पसंती दिली होती. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत तब्बल साडेतीन कोटींची भर पडली. कोरोनानंतर प्रथमच झालेल्या या यात्रोत्सवात उत्पन्न वाढल्याने एसटी प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

दरवर्षी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जुने सीबीएस, नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानकांसह विभागातील आगारनिहाय जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होते. नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी एसटी बसलाच परवानगी असल्याने भाविकांनी लालपरीला प्राधान्य दिले होते. नवरात्रोत्सवासाठी 250 जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. या काळात लालपरीने 18 हजार 250 फेर्‍या पूर्ण करत सुमारे साडेपाच लाख किलोमीटर धावली. सप्तशृंगगडावर जाण्यासाठी 7 लाख 82 हजार 592 प्रवाशांनी एसटीचा आधार घेतला. त्यामध्ये प्रौढ प्रवाशांसह लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. नवरात्रोत्सवात एसटीला तब्बल 2 कोटी 53 लाख 28 हजार 473 रुपयांचे उत्पन्न मिळाले. कोजागरी पौर्णिमेसाठी नाशिक – सप्तशृंगगड या मार्गावर 225 जादा बसेस धावल्या. 5 हजार 544 फेर्‍यांच्या माध्यमातून एसटी महामंडळाला 67 लाख 88 हजार 94 रुपयांचे उत्पन्न मिळाले. पौर्णिमेच्या एका दिवसात लालपरीने तब्बल पावणेदोन लाख किलोमीटर अंतर पार केले. या कालावधीत 2 लाख 29 हजार 693 प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. त्या माध्यमातून 82 लाख 15 हजार 137 रुपयांचे उत्पन्न मिळाले.

नवरात्रोत्सव लालपरीची झालेली वाहतूक अशी…
फेर्‍या 18,721
उत्पन्न 2,53,28,473 रुपये
प्रवासी 7,82,592

कोजागरीमध्ये लालपरीची झालेली वाहतूक अशी…
फेर्‍या 5,250
उत्पन्न 82,15,137 रुपये
प्रवासी 2,29,693

हेही वाचा:

Back to top button