नाशिक : ...म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी | पुढारी

नाशिक : ...म्हणून शहर पोलिस दलातील 22 पोलिसांची चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिस दलातील दोन अधिकारी व 20 कर्मचार्‍यांची उघड व गोपनीय चौकशी सुरू आहे. या पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांविरोधात तक्रार अर्ज, कामकाजातील कसूर, संशयास्पद कृत्य केल्याच्या तक्रारी पोलिस आयुक्तांना मिळाल्या होत्या. त्यानुसार या पोलिसांना इतर जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांची चौकशी केली जात आहेत.

पोलिस दलात कार्यरत असताना, काही पोलिसांकडून आर्थिक गैरव्यवहार, कामात कुचराई होत असते. तसेच नागरिक – लोकप्रतिनिधींकडूनही काही पोलिसांविरोधात तक्रारी केल्या जात असतात. त्यामुळे या आरोप, तक्रारींची शहानिशा वरिष्ठ पोलिसांकडून होत असते. त्यानुसार गेल्या काही दिवसांत पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी एक सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षकासह 20 पोलिस कर्मचार्‍यांविरोधात तक्रारी आल्याने त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यात मे ते सप्टेंबरदरम्यान दोन अधिकारी व 20 कर्मचार्‍यांकडील कामाची जबाबदारी बदलली आहे. यांना नियंत्रण कक्षासह बंदोबस्त, गार्ड ड्यूटी, व्हीआयपी ड्यूटी, कैदी पार्टी अशी जबाबदारी सोपविली आहे. आयुक्त नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोलिसांविरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच गोपनीय शाखेकडून कामात कसूर केल्याचा अहवाल, तक्रार अर्ज आले आहेत. तसेच पाहणीत काही पोलिसांनी संशयास्पद कृत्ये केल्याचे अहवाल समोर आल्याने त्यांना पोलिस ठाण्यातील जबाबदारीऐवजी इतर जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत. एका पोलिसाची नियुक्ती ही दुचाकी चोर्‍या उघडकीस आणण्यासाठी तयार केलेल्या पथकात करण्यात आली आहे.

तर आस्थापना मंडळासमोर प्रकरणे ठेवणार
कसूर, तक्रारींची शहनिशा तसेच उघड व गोपनीय चौकशींच्या आधारे शासनाकडून सर्वसाधारण बदल्यांवरची स्थगिती उठल्यानंतर आस्थापना मंडळासमोर या पोलिसांची प्रकरणे ठेवण्यात येतील. पोलिस महासंचालकांनी सर्वसाधारण बदल्यांवरची स्थगिती लवकरच उठविण्यात येणार असल्याची तोंडी माहिती नाशिक भेटीत दिली होती, असेही पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button