दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ | पुढारी

दिपोत्सव : प्रकाशपर्वाच्या स्वागतासाठी रांगोळ्यांनी सजली बाजारपेठ

नाशिक : अंजली राऊत
भारतीय सण-उत्सव, समारंभ विशेष कार्यक्रमात आकर्षक रांगोळीने उत्सवाचे आणि आलेल्या पाहुण्यांचे आनंदाने स्वागत केले जाते. सण-उत्सवाला आधुनिकतेची झालर चढवली गेली असली तरी पारंपरिक पद्धतीने सडासंमार्जन करून सुरेख रांगोळीचे महत्त्व आजही तितकेच आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवापाठोपाठ येणारे प्रकाशपर्व दीपोत्सवाच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी रांगोळ्यांनी शहरातील बाजारपेठ सजली आहे. मेनरोड, सराफ बाजार कॉर्नर, शालिमार, वावरे लेन येथे रांगोळी खरेदीसाठी घराघरांतील गृहिणींची आतापासूनच लगबग दिसून येत आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे सर्वच व्यवसायांवर मर्यादा आल्या होत्या. रांगोळीच्या व्यवसायावरही थोड्याफार प्रमाणात गदा आली होती. कोरोना कालावधीतही रांगोळीचा व्यवसाय संथगतीने सुरूच होता. यंदा मात्र निर्बंध उठल्याने रांगोळी विक्रेत्यांनी जोमात तयारी केली आहे. सण-उत्सवाचा वेध घेऊन श्रावणापासूनच रांगोळीसाठी तयारी केली जाते. यामध्ये रंगांची रांगोळी करणे, पॅकिंग करणे, रांगोळीच्या गोण्या भरून ठेवणे अशी विविध तयारी केली जाते. पांढर्‍या रांगोळीमध्ये नैसर्गिक रंगाचा वापर करून विविधरंगी रांगोळी तयार केली जाते. रांगोळीप्रमाणेच येथील बाजारपेठेत 40 रुपये किलोप्रमाणे चांगल्या दर्जाचे आरारोट वापरलेला गुलालदेखील उपलब्ध आहे. नाशिकच्या रांगोळीला ग्राहकांकडून पसंती असल्यामुळेच त्र्यंबकेश्वर, डहाणू, घोटी, जव्हार, मातोरी, दिंडोरी, पिंपळगाव, अहमदाबाद येथून ग्राहक रांगोळी खरेदीसाठी हजेरी लावतात.

राजस्थानमधून होते आयात : प्रत्येक शुभारंभाप्रसंगी काढली जाणारी ही रांगोळी राजस्थान येथून आणली जाते. त्यासाठी तब्बल 77 हजार रुपयांचे केवळ गाडीभाडे करून रांगोळी शहरात दाखल झाल्याचे एका रांगोळी विक्रेत्याने सांगितले. रांगोळी व्यवसाय हा वर्षभर तर चालतोच, मात्र सण उत्सवांमध्येही या व्यवसायात लाखोंची उलाढाल होत असल्याचे दिसून येते.

वावरे लेनमध्ये सुमारे 50 वर्षांपासून घर आणि दुकान एकच असल्याने कोरोना कालावधीतही ग्राहकांनी रांगोळी खरेदीसाठी हजेरी लावली होती. त्यामुळे कोरोनामध्येही व्यवसाय सुरू होता. 25-30 वर्षांपूर्वी 50 किलो रांगोळीची गोणी 50 रु. ला विकत होतो. त्याच गोणीला आता 220 रु. चा भाव आहे. 28 रंगांची रांगोळी उपलब्ध असून, चांगल्या दर्जाची रांगोळी आहे. त्र्यंबकेश्वरसह अहमदाबाद येथूनही ग्राहक येतात. – सुरेश सारासर, रांगोळी विक्रेता, वावरे लेन, मेनरोड.

हेही वाचा:

Back to top button