नाशिक : अज्ञाताने केला हल्ला; मुलाचा मृत्यू तर वयोवृद्ध वडील जखमी | पुढारी

नाशिक : अज्ञाताने केला हल्ला; मुलाचा मृत्यू तर वयोवृद्ध वडील जखमी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

कातरवाडी शिवारात रात्रीच्या वेळी पत्र्याच्या शेडमध्ये गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर अनोळखी मारेकऱ्याने केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला. वयोवृद्ध वडील गंभीर जखमी झाले असून, रुग्णालयात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेने चांदवड तालुक्यातील कातरवाडी परिसर हादरला आहे.

तालुक्यातील कातरवाडी शिवारात राहत असलेले वयोवृद्ध बाबूराव महादू झाल्टे हे मुलगा सोपान (40) आणि सून मनीषा (३१) यांच्यासोबत मंगळवारी (दि.११) रात्री अकराच्या सुमारास पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. मारेकऱ्याने शेडमध्ये अलगद प्रवेश करत लाकडी दांडक्याने सोपानच्या डोक्यावर आणि कानावर सपासप वार केल्याने तो जागीच मृत झाला. या हल्ल्याने जागे झालेले वयोवृद्ध बाबूराव झाल्टे यांच्यावरदेखील मारेकऱ्याने हल्ला केल्याने बाबूराव झाल्टे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. सून मनीषाने आरडाओरडा करत परिसरातील नागरिकांना जागे केल्याने त्यांनी धाव घेतली. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती देताच मनमाडचे उपविभागीय पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी बाबूराव झाल्टे यांना उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्याच्यावर डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मनीषा झाल्टे (वय ३१) यांच्या फिर्यादीनंतर अनोळखी मारेकऱ्याविरोधात चांदवड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर करीत आहेत.

गावाला पोलिस छावणीचे रूप : 

तालुक्यातील कातरवाडी येथील खून नेमकी कोणी व कोणत्या कारणास्तव केला याची उकल अद्याप न झाल्याने पोलिस कसून चौकशी करीत आहे. दरम्यान, बुधवार (दि.१२) कातरवाडी गावात पोलिसांची अधिकची कुमक बोलवण्यात आल्याने गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

हेही वाचा:

Back to top button