नाशिक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याच्या मृत्यू; पालकांचा आरोप | पुढारी

नाशिक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकल्याच्या मृत्यू; पालकांचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ताप आलेल्या आठ महिन्यांच्या बालकाचा मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात मंगळवारी (दि. ११) सायंकाळी मृत्यूनंतर डॉक्टरांचे दुर्लक्ष आणि हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव पसरला होता. परंतु पोलिसांनी समजूत काढून जिल्हा रुग्णालयीन समितीमार्फत पडताळणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला आणि दुपारी चारच्या सुमारास नातेवाइकांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेतला.

अर्णव समाधान निकम (८ महिने) याचा आजारपणामुळे मंगळवारी मृत्यू झाला. अंबड परिसरातील चुंचाळे शिवारातील दत्तनगर परिसरात निकम कुटुंबीय राहतात. अर्णव आजारी पडल्याने त्याच्यावर मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अर्णवचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. अर्णवच्या मृत्यूस रुग्णालयासह दोन डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप आई-वडिलांसह नातलगांनी केला. बुधवारी (दि.१२) सकाळीच नातेवाइक जिल्हा रुग्णालयातील शवागृहाबाहेर जमले. डॉक्टरांना ताब्यात घेत चौकशी होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहकले, निरीक्षक चंद्रकांत आहिरे, सहायक निरीक्षक यतीन पाटील, उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांचे पथक दाखल झाले. त्यांनी पालकांची समजूत काढली. सामाजिक कार्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची पालकांनी भेट घेतली. पोलिसांकडून संपूर्ण माहिती प्राप्त झाल्यावर त्वरित समितीतर्फे या प्रकरणी पडताळणी करून अभिप्राय देतो. त्यानंतर पोलिस योग्य कारवाई करतील, असे आश्वासन डॉ. थोरात यांनी दिले. त्यानंतर नातेवाइकांनी जबाबात अधिकचे मुद्दे समाविष्ट करण्याची विनंती पोलिसांना केली. त्यानंतर पालकांनी अर्णवचा मृतदेह ताब्यात घेतला.

रुग्णालयातले सीसीटीव्ही फुटेज, उपचारांची फाइल ताब्यात घेतली आहे. अर्णवच्या वडिलांचा संपूर्ण जबाब, पोलिसांच्या कव्हरिंग लेटरसहित जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात येईल. त्यांच्या समिती अहवालातील बाबींनुसार पुढील कारवाईचा निर्णय होईल. – सुनील रोहकले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई नाका

पालकांनी केले आरोप…

– डॉक्टरांनी व्हिडिओ कॉलवरून अर्णववर उपचार केले

– उपचारात हलगर्जीपणा केला

– अर्णवच्या मृत्यूनंतर जाब विचारला असता रुग्णालयाच्या प्रतिनिधींकडून दमदाटीचा आरोप

हेही वाचा:

Back to top button