Nashik : लासलगावला यंदाही शेतमाल तारण कर्जयोजना | पुढारी

Nashik : लासलगावला यंदाही शेतमाल तारण कर्जयोजना

लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यात खरिपातील मका व सोयाबीन काढणीचे काम सुरू झाले आहे. शेतीमाल एकाच वेळी विक्रीस आल्यामुळे बाजारभाव घसरून शेतकर्‍यांचे होत असलेले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लासलगाव बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे 2022-23 या हंगामाकरिता शेतमाल तारण कर्जयोजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत 1990-91 पासून राबविण्यात येणार्‍या योजनेंतर्गत बाजार समिती या हंगामाकरिता मका, सोयाबीन, हरभरा व गहू या शेतमालासाठी तारण कर्जयोजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेंतर्गत फक्त उत्पादक शेतकर्‍यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे. शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरीत्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, हरभरा व गहू हा शेतीमाल ज्या दिवशी राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल, त्या दिवसाचे सरासरी बाजारभाव किंवा त्या मालाचे किमान आधारभूत दर यापैकी जे कमी असेल, ते विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाच्या पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकर्‍यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे.

संबंधित शेतकर्‍यांचा खाते उतारा व सातबारा उतार्‍यावरील मका, सोयाबीन, हरभरा व गव्हाचे लागवड क्षेत्र व उत्पादित माल याचे प्रमाण ठरवून एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून सहा महिन्यांच्या मुदतीने सहा टक्के व्याजदराने शेतकर्‍यांना अदा करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या सहा महिन्यांकरिता 8 टक्के व त्यापुढील 6 महिन्यांकरिता 12 टक्के व्याजदराने आकारणी केली जाणार आहे. 18 महिन्यांनंतर या कर्जास मुदतवाढ मिळणार नाही. या योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button