ईद- ए-मिलादुन्नबी : मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीने मोहम्मद पैंगबर जयंती साजरी | पुढारी

ईद- ए-मिलादुन्नबी : मनमाडमध्ये पारंपरिक पद्धतीने मोहम्मद पैंगबर जयंती साजरी

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा

जगाला शांती, सदभावना व बंधुभावचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैंगबर (सं.अ.) यांचा जन्मदिवस अर्थात ईद- ए-मिलादुन्नबी मनमाड शहरात रविवारी (दि.9) पारंपरिक पद्धतीने अभूतपूर्व जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त नागरिकांना थंडपेयासोबत मिठाई वाटप करण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून भव्य जुलुस काढण्यात आल्याने हजारोंनी या जुलुयमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 

मुस्लिम बांधवांसोबत इतर समाजबांधव देखील जुलूसमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामुळे पैगंबर जयंतीत राष्ट्रीय एकात्मता दिसून आली. ईद-ए-मिलाद निमित्त शहरातील वेगवेगळ्या भागातील तरुणांनी आकर्षक देखावे उभारले. शिवाय शहरात ठिकठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षा नंतर ईद-ए-मिलाद साजरी करण्याची संधी मिळाल्यानंतर जामा मस्जिदचे मौलाना असलम रिजवी साहब यांच्यासह शहरातील इतर सर्व प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली सकाळी भव्य जुलूस काढण्यात आला. नारा-ए-तकबीर अल्लाह हु अकबर, हुजूर का दामन नही छोडेंगे यासह इतर घोषणा देत जुलूस उस्मानिया चौकात जुलूस आल्यावर येथे ठाकरे गटाच्या शिवसेने कडून, डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर इंडीयन हायस्कूलजवळ आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडून प्रमुख मौलानाचा सत्कार करून मुस्लीम बांधवाना शुभेच्छा देण्यात आल्या.

गायकवाडचौक 52 नंबर भागात जुलूस आल्यावर येथे हुसेनी कमिटीच्या वतीने मौलानासोबत इतर मुस्लीम नेते, धर्मगुरू यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील विविध मार्गावरून जावून जुलूसची जामा मस्जिद जवळ सांगता झाली. यावेळी जगात व देशात शांतता नांदावी, भारतात सर्व जाती धर्मांच्या लोकांमध्ये सलोख्याचे कायम संबध रहावे. सर्व क्षेत्रात देशाची भरभराट व्हावी यासाठी विशेष दुवा करण्यात आली. ईद-ए-मिलाद निमित्त पाकिजा कॉर्नर, उस्मानिया चौक, एकात्मता चौक, रेल्वे स्टेशन गेट, गायकवाड चौक, जमधाडे चौक, इदगाह चौक, हुसेनी चौक यासह इतर ठिकाणी वेगवेगळ्या ग्रुपतर्फे पाणी, शरबत, मिठाई, चॉकलेट, खजूरवाटप करण्यात आले. तर काही ठिकाणी आकर्षक देखावे उभारण्यात आले आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे.

हेही वाचा:

Back to top button