नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे 'तीन' महत्वाचे प्रकल्प | पुढारी

नाशिक : महापालिका सौरऊर्जेवर राबविणार हे 'तीन' महत्वाचे प्रकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारकडून महापालिकेला 15 व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून महापालिका सौरऊर्जेवरील तीन प्रकल्प राबविणार आहे. त्यापैकी पहिल्या प्रकल्पांतर्गत शहरातील शौचालयांवर सौरऊर्जेचे पॅनल बसवून त्याद्वारे वीजपुरवठा केला जाणार आहे. तसेच घंटागाडीच्या पार्किंग जागेवर सीसीटीव्ही बसविण्यात येणार असून, शहरातील 42 पैकी 22 सिग्नलचे सिंक्रोनायझेशन करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने कळविले आहे.

केंद्र सरकारकडून प्राप्त होणार्‍या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हवेतील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत (एनसीपीए) शहरात तीन प्रकल्पांत सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत शहरात सहा विभागांत असलेल्या 113 सुलभ शौचालयांवर सौरऊर्जेचा वापर होणार आहे. एका शौचालयासाठी एक लाख 35 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 113 ठिकाणे मिळून सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. शहरात वाहतूक विभागाने 42 सिग्नल बसविलेले आहेत.

वाहतूक समस्येवर मात करण्यासाठी यापैकी 22 सिग्नलचे सिंक्रोनायझेशन केले जाणार आहे. असे झाल्यास वाहनधारकांना एकाचवेळी विना अडथळा अनेक सिग्नल पार करता येऊ शकतात. एका सिग्नलसाठी दोन लाख 25 हजारांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे 22 सिग्नलसाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

सौरऊर्जेच्या संबंधित तिन्ही प्रकल्पांंचे प्रस्ताव मनपामार्फत केंद्र शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. प्रकल्प कार्यान्वित झाल्यास वीजवापरात बचत होईल शिवाय हवा प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.
– उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका

हेही वाचा :

Back to top button