नाशिक : दारू पाजत गळा आवळून पत्नीचा खून, फरार पती जेरबंद | पुढारी

नाशिक : दारू पाजत गळा आवळून पत्नीचा खून, फरार पती जेरबंद

लासलगाव : (जि. नाशिक) वृत्तसेवा
मोलमजुरी करणार्‍या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला दारू पाजत गळफास देत हत्या केल्याची घटना निफाड तालुक्यातील मानोरी खुर्द येथे घडली. आशा प्रेमा वास्कली असे मृत पत्नीचे नाव असून तिच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.

प्रेमा वास्कली हा मध्य प्रदेशातील खरगोण जिल्ह्यातील तिरी या गावातून पत्नी आशासोबत पोटापाण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मानोरी खुर्द येथे राहायला आला होता. हे कुटुंब शेतकरी अंबादास संबेराव यांच्या शेतात मोलमजुरीचे काम करून उदरनिर्वाह करत होते. प्रेमा वास्कलीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आशाला दारू पाजून तिला साडीच्या साह्याने गळफास देत तिचा खून केला.

वास्कली दांपत्य शेतीकामासाठी न आल्याने त्यांच्या झोपडीत पाहण्यासाठी गेलेल्या संबेराव यांना आशाचा मृतेदह दिसला. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना दिली. खुनानंतर पती पळून गेला होता. परंतु पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे येवला येथे प्रेमा वास्कलीचा माग काढत त्याला अटक केली आणि खुनाचा गुन्हा नोंदविला.

हेही वाचा :

Back to top button