अकरावी प्रवेशासाठी आजपासून दुसरी डीएमआर फेरी | पुढारी

अकरावी प्रवेशासाठी आजपासून दुसरी डीएमआर फेरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता अकरावीच्या ऑनलाइन केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत राबविण्यात आलेल्या पहिल्या दैनंदिन विशेष फेरी अ‌र्थात ‘डेली मेरिट राउंड-डीएमआर’ला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या फेरीत २३० विद्यार्थ्यांना संधी देण्यात आली होती. त्यापैकी १८५ विद्यार्थ्यांनी पाच दिवसांत प्रवेश निश्चित केले. मात्र, अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे सोमवार (दि. ३) पासून दुसरी ‘डीएमआर’ फेरी राबविण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने घेतला आहे.

शहरातील विविध ६३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या २६ हजार ४८० जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत तीन नियमित व तीन विशेष तसेच एक ‘डीएमआर’ अशा एकूण सात फेऱ्या पार पडल्या आहेत. या फेऱ्यांतर्गत १८ हजार ५७९ विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर ७ हजार ९०१ जागा अद्यापही रिक्त आहेत. अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने दुसऱ्या ‘डीएमआर’ फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या फेरीचे कामकाज १५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

दुसऱ्या ‘डीएमआर’ फेरीची नवीन विद्यार्थी नोंदणी, नवीन अर्ज भाग – एक भरणे आणि त्यामध्ये बदल करण्यासाठी अर्ज अनलॉक करणे आदी प्रक्रिया तसेच मार्गदर्शन केंद्र लॉगिन ४ ऑक्टोबरपासून बंद होईल. अर्ज पडताळणी फक्त शिक्षण उपसंचालकांच्या लॉगिनवरूनच केली जाऊ शकेल. कोणताही नवीन अर्ज आपोआप प्रमाणित होणार नाही. प्रत्येक नवीन नोंदणी शिक्षण उपसंचालकांच्या तपासणीनंतरच पूर्ण होईल. यापूर्वी प्रवेशासाठी निवड होऊनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयासाठी या फेरीत प्रवेश मिळणार नाही. प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांनादेखील त्या महाविद्यालयासाठी प्रतिबंधित केले जाईल.

दरम्यान, या फेरीत प्रवेश रद्द करण्याची परवानगी असणार नाही. कोटा आणि द्विलक्षी प्रवेशप्रक्रिया नियमित सुरू राहील. अकरावीतून अकरावीमध्ये प्रवेशाची परवानगी दिली जाणार नाही. तसेच दुबार प्रवेश घेणारे अथवा जाणीवपूर्वक जागा अडवून ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत कडक कारवाई केली जाईल, असे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेशाची स्थिती

महाविद्यालये – ६३

जागा – २६,४८०

नोंदणी – २८,८६०

प्रवेश निश्चित – १८,५७९

रिक्त जागा – ७,९०१

हेही वाचा :

Back to top button