ग्रामपंचायत निवडणूक : नाशिकमध्ये उमेदवारांकडून मागितला जातोय मतांचा जोगवा | पुढारी

ग्रामपंचायत निवडणूक : नाशिकमध्ये उमेदवारांकडून मागितला जातोय मतांचा जोगवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, त्र्यंबक आणि सुरगाणा या चार तालुक्यांमधील १९४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायतींमध्ये पुढील दोन आठवडे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधत उमेदवारांनी सार्वजनिक देवी मंडळांच्या मंडपांमध्ये तसेच गरब्याच्या ठिकाणी हजेरी लावत ग्रामस्थांकडे मतांचा जोगावा मागितला.

जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यातील १९४ ग्रामपंचायतींमध्ये माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले आहे. सुरगाण्यात १८८ जणांनी माघार घेतली असून, तालुक्यातील प्रत्येकी तीन ग्रामपंचायती व थेट सरपंच बिनविरोध निवडून आले. पेठमध्ये थेट सरपंचपदाच्या शर्यतीमधून ५८, तर सदस्यांसाठी ७२ उमेदवारांनी माघार घेतली असून, २ सरपंच बिनविराेध आले. त्र्यंबकेश्वरमधील ५७ पैकी 3 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, तालुक्यातील ६ सरपंच व २६१ सदस्य बिनविराेध झाले. इगतपुरीत 5 पैकी एका ठिकाणी सरपंच व सदस्यांसाठी १९ जणांनी त्यांचे अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणातील उर्वरित उमेदवारांनी आता प्रचारावर भर द्यायला सुरुवात केली.

चारही तालुक्यांतील ग्रामपंचायतींसाठी येत्या १६ तारखेला मतदान, तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी मिळाला आहे. त्यातच सध्या नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पाेहोचला आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासह गावातील देवी मंदिर, सार्वजनिक मंडळ तसेच गरब्याच्या ठिकाणी उमेदवार हजेरी लावत आहेत. तेथील भाविकांना मतांसाठी आर्जव केले जात आहे. बुधवारी (दि. ५) त्या निमित्ताने उमेदवारांनी जोरदार तयारी केली आहे. उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा उत्साह बघता, पुढील १२ दिवस ग्रामस्थांचे राजकीय मनोरंजन होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button