नाशिक: सप्तशृंग देवीच्या महापूजेचा मान सर्वसामान्य भाविकाला | पुढारी

नाशिक: सप्तशृंग देवीच्या महापूजेचा मान सर्वसामान्य भाविकाला

सप्तशृंगगड; पुढारी वृत्तसेवा: शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी आज (दि. २) देवीचे सातवे रूप कालरात्रीची पूजा बांधली. आईच्या गळ्यात माळ आहे. जी विजेसारखी चमकत राहते. देवी कालरात्रीला चार हात आहेत. आईच्या हातात खड्ग, शस्त्र, वरमुद्रा आणि अभय मुद्रा आहे.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी हजारो भाविकांनी भक्तिमय वातावरणात देवीचे दर्शन घेतले. यावेळी अॅड. दीपक पाटोदकर यांनी श्री सप्तशृंग देवीच्या महापूजेचा मान सर्वसामान्य भाविकाला देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार मंदिरात गर्दीतून दर्शनासाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भाविक प्रकाश लक्ष्मण झोलेकर व सखुबाई झोलेकर (रा. धुमालवाडी, ता. अकोले) यांना मान देण्यात आला. स्वतःचा मान सर्वसामान्य भाविकाला देण्याचा अॅड. दीपक पाटोदकर यांचा निर्णय भाविकांमध्ये कौतुकास्पद ठरला. महापूजेचे दुसरे मानकरी धर्मादाय सह आयुक्त तुफानसिंग अकाली यांनी महापूजा व आरती प्रसंगी उपस्थित राहून श्री भगवतीचे दर्शन घेतले.

सकाळी सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी देवीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर, अधीक्षक सचिन पाटील, डॉ. प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, अतुल चांडक यांनी श्री भगवतीचे दर्शन घेतले.

महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्ट आणि प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button