धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच | पुढारी

धुळे : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच

धुळे, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे भाजपकडून निवडून आलेल्या सदस्यांमधून अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासाठी जिल्ह्यातील नेत्यांकडे लॉबिंग सुरू झाले आहे. धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ८ जानेवारी २०२० रोजी झाली होती. या निवडणुकीत ५६ जागांपैकी ३९ जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या होत्या. मात्र त्यानंतर ओबीसी जागांच्या वादातून काही सदस्यांचे पद रद्द झाले. परिणामी या जागांवर फेर मतदान झाल्याने भारतीय जनता पार्टीला तीन जागांचे नुकसान झाले.

सध्या स्थितीत जिल्हा परिषदेमध्ये ५६ पैकी भारतीय जनता पार्टीचे ३६, काँग्रेसचे ७ ,राष्ट्रवादीचे ६, शिवसेनेचे ४ तर अपक्ष ३ असे संख्याबळ आहे. वरील संख्याबळ पाहता भाजपकडे आजही स्पष्ट बहुमत असल्याने जिल्हा परिषदेत परिवर्तन होण्याची सुतराम शक्यता नाही. धुळे जिल्हा परिषदेतून सर्वात जास्त १४ सदस्य शिरपूर तालुक्यातून निवडून आले असून शिंदखेडा तालुक्यातून भाजपाचे ८ साक्री मधून ७ तर धुळे तालुक्यातून ७ सदस्य बीजेपीच्या माध्यमातून निवडून आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पुन्हा शिरपूर तालुक्याकडूनच आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी शिरपूर तालुक्याच्या माध्यमातून आमदार अमरीश पटेल यांनी डॉ तुषार रंधे यांच्या नावाला पसंती दिल्यामुळे अध्यक्षपदांची माळ रंधे यांच्या गळ्यात पडली होती. तर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांचे समर्थक मानले जाणारे कामराज निकम यांच्या पत्नी कुसुम निकम यांना उपाध्यक्ष पदाची संधी मिळाली होती.

आता अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण निघाल्यामुळे आता शिरपूर तालुक्यातील नाव पुढे येण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे साक्री तालुक्यातून माजी केंद्रीय मंत्री खासदार सुभाष भामरे यांच्या नातेवाईक मंगला पाटील या विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या देखील नाव पुढे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष देवरे यांच्या सून धरती देवरे या धुळे तालुक्यातून विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे देखील नाव चर्चेत आहे. एकंदरीतच पक्षश्रेष्ठींच्या माध्यमातून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button