Blood Donation Day : शतकवीर रक्तदाता अधिकारी, तब्बल 102 वेळा रक्तदान

Blood Donation Day : शतकवीर रक्तदाता अधिकारी, तब्बल 102 वेळा रक्तदान
Published on
Updated on

नाशिक : रवींद्र आखाडे

रक्तदान म्हटले की, भल्या भल्या व्यक्ती मागे हटतात, काही अपवाद वगळले तर खूपच कमी व्यक्ती या पवित्र कार्यात सहभाग नोंदवतात. मात्र, शासकीय नोकरी सांभाळून या रक्तदानाच्या यज्ञात स्वत:ला वाहून घेत एका अवलियाने समाजासमोर आदर्श उभा केला आहे. गजानन माधव देवचके असे त्यांचे नाव असून, त्यांनी आजवर एक नाही, दोन नाही तर तब्बल १०२ वेळा रक्तदान करून आगळा विक्रम केला आहे. (National Voluntary Blood Donation Day)

वडील सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी कै. माधव रंगनाथ देवचके आणि पेठे हायस्कूलमध्ये उपमुख्याध्यापिका पदावर सेवानिवृत्त झालेल्या मातोश्री कै. हिरा देवचके यांच्यामुळे गजानन यांना शिक्षणाने येणारी सुजाणता आणि प्रशासकीय सेवेमुळे येणारी सामाजिक बांधिलकी याचे बाळकडू घरातूनच मिळाले. 'एमपीएससी'च्या माध्यमातून कनिष्ठ लिपिक पदापासून वर्ग-२ राजपत्रित अधिकारी या पदापर्यंतचा पल्ला गाठून त्यांनी आजपर्यंत २३ वर्षांची शासकीय सेवा पूर्ण केलेली आहे, तर शासकीय सेवा बजावत २० वर्षांपासून त्यांनी रक्तदानाच्या सामाजिक कार्यामध्ये वाहून घेतले आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून आजपर्यंत १०२ वेळा रक्तदान केले असून, यामध्ये ४२ वेळा सिंगल डोनर प्लेटलेट, एकदा कोविड प्लाझ्मा व ५९ वेळा होल ब्लड यांचा समावेश आहे. सध्या ते राज्य शासनाच्या वित्त विभागामध्ये सिन्नर येथे उपकोषागार अधिकारी म्हणून कार्यरत असून, जनकल्याण रक्तपेढीच्या प्रकल्प समितीमध्ये संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत.

अवघ्या कुटुंबाला रक्तदानाचा ध्यास

रक्तदानाच्या या कार्यात त्यांनी त्यांचा मित्र परिवार, कार्यालयातील सहकारी तसेच नातेवाईक, पत्नी व मुली यांनादेखील प्रवृत्त केले आहे. त्यांची अर्धांगिनी अश्विनी देवचके यांनीही १३ वेळा रक्तदान केले आहे. त्या जिल्हा सत्र न्यायालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २१ वर्षीय कन्या कु. अनुष्का हिनेही ४ वेळा रक्तदान पूर्ण केले असून, १६ वर्षीय धाकटी कन्या कु. अक्षता हीदेखील रक्तदानासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

पहिल्या रक्तदानाचा असाही अनुभव

महाविदयालयीन जीवनात लॅबमध्ये स्वत:चे रक्त काढलेले पाहून भोवळ येऊन पडलेली व्यक्ती इतके मोठे कार्य उभे करू शकते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावल्यामुळे त्यांच्या आजोबांना रक्ताची नितांत गरज होती. त्यावेळी जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. बाबू यंदे यांच्या हस्ते पहिले रक्तदान दि. २१ एप्रिल २००२ रोजी केले. त्याच डॉ. यंदे यांच्या हस्ते त्यांचे 100 वे रक्तदान झाले.

राष्ट्रीय विक्रमाची नोंद

गजानन देवचके यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेने घेतली आहे. यामध्ये 'राज्य शासनाच्या सेवेतील १०० वेळा रक्तदान करणारा गट 'ब' संवर्गातील एकमेव राजपत्रित अधिकारी म्हणून राष्ट्रीय विक्रम नोंदविला गेला आहे. या विक्रमाचे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व पदक त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

अनेक पुरस्कारांनी गौरव

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते सत्कार

कोविडयोध्दा, जीवनदाता, शतकवीर रक्तदाता, पंचवटी गौरव, बाळशास्त्री जांभेकर आदी पुरस्कारांनी सन्मानित

अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी एका शासकीय संस्थेत ध्वजारोहणाचाही मान

स्टेम सेल (बोन मॅरो डोनेशन) साठी स्वेच्छेने नावनोंदणी करणारी पहिली व्यक्ती

एकाच रक्तपेढीमध्ये सलग १०० वेळा रक्तदान करणारा रक्तपेढीचा पहिला संचालक

गट 'ब' संवर्गातील पहिला राजपत्रित अधिकारी होण्याचा मान

पाचवर्षीय कन्येनेही दर्शविली तयारी

पाचवर्षीय कन्या अक्षताच्या वाढदिवशी जनकल्याण रक्तपेढीत रक्तदान करत असताना बाजूच्या डोनेशन चेअरवर बसलेल्या अक्षताला तेथील वैदयकीय अधिकाऱ्यांनी 'हिचेही रक्त काढून घ्या, असे चेष्टेत दरडावले. मात्र, त्यावेळी तिनेदेखील न घाबरता डावा हात पुढे करून रक्त देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे आपणही आचरणातून आदर्श पित्याची छबी मुलांच्या बालमनावर बिंबवू शकतो, याचे प्रत्यंतर या उदाहरणातून प्रत्यक्ष दिसले.

रक्तदानाचे गैरसमज दूर होऊन त्याबाबत आवड व गोडी निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रबोधनातून तरुण पिढीला रक्तदानाकडे वळविण्याचा मानस आहे. रक्तपेढ्यांमधील रक्ताचा तुटवडा कमी होऊन राज्यातील गरजू बांधवांपर्यंत निर्भेळ व उत्तम रक्त मर्यादित वेळेत व मुबलक प्रमाणात उपलब्ध करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचा रक्तदानातील सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी काही नवनवीन कल्पना आहेत. याबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत भेटीची संधी उपलब्ध झाल्यास याबाबत चर्चा करण्याची प्रखर इच्छा आहे.

– गजानन देवचके, उपकोषागार अधिकारी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news