नवरात्रोत्सव : साक्रीत एक अनोखी घटस्थापना | पुढारी

नवरात्रोत्सव : साक्रीत एक अनोखी घटस्थापना

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री येथील नवापूर रस्त्यावरील वंजारातांडा येथे जय मातादी संत शिरोमणी सेवालाल महाराज मित्र मंडळाच्या वतीने नवरात्री उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापनेच्या दिवशी वाजत गाजत मिरवणूक काढून देवीच्या आकर्षक मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते.

21 फुटांचा त्रिशुल ठरतोय आकर्षण
वंजारतांडा येथील पाच तरुणांनी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील देवी समोरील ज्योत पेटवून सलग दीड दिवस गडावरुन साक्रीपर्यंत पळत येत देवीच्या स्थापनेसमोरील होमकुंडात टाकून तो पेटविण्यात आला. दहा दिवस हा होमकुंड पेटता राहणार आहे. तसेच स्थापनेच्या ठिकाणी सुमारे २१ फुट भव्य असा त्रिशुल उभा करण्यात आला आहे. हा त्रिशुल साक्रीकरांसाठी आकर्षणाचा केंद्र बनला आहे.

छातीवर घटस्थापना
या ठिकाणी कोल्हापूर येथील बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज यांनी स्वतःच्या छातीवर घटस्थापना केली आहे. नऊ दिवस ते अन्नग्रहण न करता फक्त पाणी ग्रहण करून शवासन अवस्थेत नवरात्री दिवसाची साधना करणार आहेत. दहा दिवसात अखंड ज्योती यज्ञ चालू राहणार आहे. तर दहा दिवस साधना दर्शन व प्रसाद तसेच दहाव्या दिवशी विजयादशमीला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या सोहळ्या दरम्यान साधू संतांच्या तसेच भक्त मंडळींच्या उपस्थितीत अनुष्ठान समाप्ती होईल.

सकाळी ११ वाजेपासून नवापूर रस्त्यावरील बंजारा तांडा येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. स्वतःच्या शरीरावर केलेली घटस्थापना दर्शन होईल. त्यानंतर दुपारी तीन वाजता विसर्जन मिरवणूक निघेल.

श्री बालयोगी परमहंस महेशश्वरानंद महाराज यांना भस्म व हळद कुंकवाचा लेप लावून अंघोळ घालन्यात आली. नवीन वस्त्र परिधान करण्यात आले, भक्त गणांनी आशीर्वाद घेतल्या नंतर महाराजांनी देवीच्या समोर आसनावर सात महिलांचा व पुरुष बांधवांच्या हाताने स्वतःच्या शरीरावर घटस्थापना करून घेतली. महाराज पुढील नऊ दिवस अन्नग्रहण न करता फक्त पाण्यावर राहणार आहेत. पुढील नऊ दिवस अखंड जितीयज्ञ सुरू राहणार आहे. महाराज यांच्या दर्शनाची वेळ सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजे पर्यतची असणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन साक्री शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संयोजन साक्री शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button