नाशिक : कालिकादेवी यात्रोत्सवामुळे शहरात वाहतूक मार्गात बदल | पुढारी

नाशिक : कालिकादेवी यात्रोत्सवामुळे शहरात वाहतूक मार्गात बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी यात्रोत्सवाला सोमवार (दि. 26) पासून प्रारंभ होत आहे. या यात्रेत लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरात यात्रोत्सव असल्याने रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांची दुकाने, रहाटपाळणेही आहेत. या ठिकाणी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शहर वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.

यात्रोत्सव काळात मुंबई नाका ते गडकरी सिग्नलपर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. संभाव्य वाहतूक कोंडी व गर्दी टाळण्यासाठी शहर पोलिस व वाहतूक शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना काढली असून, त्यानुसार दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत कालिका मंदिर परिसरातून होणार्‍या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पहाटे 5 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते रात्री 12 पर्यंत या वाहतूक मार्गात बदल असतील.

वाहतूक मार्गातील बदल
मोडक सिग्नल ते संदीप हॉटेल कॉर्नर, मनपा आयुक्त निवासस्थानापासून ते भूजल सर्वेक्षण कार्यालय, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेलपर्यंत दुतर्फा सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक मोडक चौक सिग्नल येथून खडकाळी सिग्नलमार्गे 60 फुटी रोडने द्वारका सर्कलमार्गे नाशिकरोड व सिडकोकडे जाईल. मुंबई नाक्याकडून शहरात येणारी हलकी वाहने महामार्ग बसस्थानक, तूपसाखरे लॉन्स, ह्युंदाई शोरूमसमोरून चांडक सर्कल, भवानी सर्कल यामार्गे त्र्यंबकरोडने शहरात येईल. तर शहरातून सातपूर आणि अंबडकडे जाणारी वाहने द्वारका सर्कलमार्गे गरवारे-टी पॉइंटमार्गे सातपूर एमआयडीसीमध्ये जातील. द्वारका सर्कल येथून पंचवटीत जाणारी जड वाहने ही कन्नमवार पूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी हायस्कूल मार्गाने पंचवटीत जातील. सारडा सर्कलकडून गडकरी चौकाकडे येणारी वाहने एन. डी. पटेल रोड, किटकॅट वाइन शॉप चौफुली मार्गाने मोडक सिग्नलमार्गे जातील.

हेही वाचा :

Back to top button