बासुंदीत झुरळ टाकून उकळली एक लाखाची खंडणी, नाशिकमधील धक्कादायक प्रकार | पुढारी

बासुंदीत झुरळ टाकून उकळली एक लाखाची खंडणी, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मिठाई खाण्याच्या बहाण्याने मिठाईत झुरळ असल्याचा आरोप करीत एकाने गंगापूर रोडवरील दोन मिठाई विक्रेत्यांकडून दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताविरोधात गंगापूर व सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संशयिताने एका विक्रेत्याकडून एक लाख रुपयांची खंडणी घेतल्याचेही समोर आले आहे.

अजय राजे ठाकूर असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरातील मधुर स्वीट्सचे मनीष मेघराज चौधरी (23, रा. गंगापूर रोड) यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात, तर विद्या विकास सर्कलजवळील सागर स्वीट्सचे रतन पुनाजी चौधरी (40, रा. लवाटेनगर) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे. सागर स्वीट्सचे रतन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अजयने कॉलेज रोडवरील सागर स्वीट्स दुकानातून बासुंदी घेत त्यात झुरळ टाकून व्हिडिओ तयार केला. झुरळाचा व्हिडिओ व्हायरल करण्यासोबत अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार करेल, अशी धमकी अजयने चौधरी यांना दिली. व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या व तक्रार न करण्याच्या मोबदल्यात अजयने चौधरी यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यामुळे चौधरी यांनी 20 ऑगस्टला सायंकाळी गंगापूर रोडवरील सागर स्वीट्स दुकानात एक लाख रुपयांची खंडणी अजयला दिली. दरम्यान, अजयने अन्न व औषध प्रशासनाकडे खाद्यपदार्थात झुरळ आढळून आल्याची तक्रार केल्याचाही आरोप होत आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस तपास करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत मनीष चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित अजय ठाकूर याने 7 ते 12 सप्टेंबरदरम्यान मधुर स्वीट्स येथे खंडणीची मागणी केली. अजयने 6 सप्टेंबरला दुकानातून रबडी घेतली. मात्र रबडीमध्ये झुरळ असल्याचे सांगत त्याने प्रकरण मिटवण्याच्या बहाण्याने दुकानाचे व्यवस्थापक पुखराज चौधरी यांच्याकडे दोन लाख ते 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. अजयने पुखराज यांना व्हॉट्सअप कॉल, मेसेज, व्हिडिओ पाठवून दुकानाची बदनामी करण्याची धमकी दिली. मात्र चौधरी यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संशयित अजय हा खाद्यपदार्थात झुरळ टाकत असल्याचे आढळून आले. त्यामुळे मनीष चौधरी यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात अजय विरोधात खंडणीची फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

Back to top button