नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या | पुढारी

नाशिक : पेन्शनचे पैसे चोरणार्‍या तिघींना धाडसी आजीमुळे बेड्या

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
बँकेतून पेन्शनचे पैसे घेऊन जात असलेल्या वृद्ध महिलेला तीन महिलांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु 65 वर्षीय आजीने त्यांचा डावच केवळ हाणून पाडला नाही तर प्रसंगावधान आणि हिंमत दाखवत भररस्त्यात एकीची जबरदस्त धुलाई केली आणि नागरिकांच्या मदतीने या तिघी लुटारू महिलांच्या हातात बेड्या पडल्या. आजींनी दाखविलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मनमाडपासून जवळ असलेल्या वंजारवाडी येथील विमलबाई गुंडगळ (65 वर्षे) या रेल्वेच्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांनी बुधवारी (दि.7) शहरातील स्टेट बँकेच्या शाखेतून पेन्शनचे 14 हजार रुपये काढल्यानंतर त्या सराफाकडे गेल्या. मात्र, दागिने तयार झाले नसल्याने त्या तेथून पुन्हा घराकडे निघाल्या. बँकेतून पैसे काढल्यापासून तीन महिला पाळत ठेवत त्यांचा क्षणाक्षणाला पाठलाग करत होत्या. विमलबाई वाटेत थंडपेय घेण्यासाठी ज्यूस बारमध्ये गेल्यावर या लुटारू महिलादेखील तेथे आल्या. ज्या बाकावर विमल आजी बसल्या होत्या त्याच्या मागच्या बाजूलाच तिघी बसल्या. त्यांनी अलगदपणे आजींची पिशवी ब्लेडने फाडून त्यातील रक्कम चोरली. त्या पसार होण्याचा प्रयत्न करत असताना विमल आजींना काहीसे वेगळे जाणवले आणि क्षणात त्यांनी पिशवी तपासून पाहताच त्यात रक्कमच नसल्याचे दिसले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत आरडाओरडा सुरू करताच तिघा लुटारू महिलांनी पळ काढला. मात्र, विमल आजींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना भर बाजारपेठेत धरले आणि तुम्ही माझे पैसे चोरले ते परत करा, अशी मागणी केली. मात्र आम्ही पैसे चोरलेच नाही, असा आव या तिघींनी आणला. तोपर्यंत लोकांची गर्दी झाली होती. विमल आजींनी त्यातील एकीला चोप देताच ती घाबरली आणि तिने चोरलेली रक्कम रस्त्यावर टाकून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, विमल आजींच्या मदतीला सचिन माकुणे, अश्पाक शेख, शशी देसाई आणि आरिफ पठाण धावून आले आणि त्यांनी तिघींना तेथेच पकडून ठेवले.

नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. गोरीबाई सिसोबिया, रिमा सिसोबिया आणि शबनम सिसोबिया अशी या संशयित महिलांची नावे असून, त्यांच्या सोबत एक लहान मुलगादेखील आहे. या सर्व महिला पाचोरा तालुक्यातील आहे. पकडण्यात आलेल्या तिन्ही महिला सराईत गुन्हेगार असल्याचा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी तिघींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button