नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात | पुढारी

नाशिक : बिबट्या अवयव तस्करीचे धागेदोरे परराज्यात

नाशिक / सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
अंबोली (ता. त्र्यंबकेश्वर) येथे बिबट्याच्या अवयवांची तस्करी करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला यश आले आहे. या कारवाईत संशयित तस्कर आणि वनाधिकार्‍यांमध्ये झटापटही झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी हवेत गोळीबार करून चौघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाचे धागेदोरे थेट परराज्यापर्यंत पोहोचल्याची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांनी दिली आहे.

नाशिक उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी चौघा संशयित तस्करांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वन्यजीव तस्करीचे नाशिक कनेक्शन पुन्हा समोर आले आहे. मागील काही घटनांपासून इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात तस्करांचे स्लिपर सेल कार्यरत असून, स्थानिक टोळ्यांना हाताशी धरून तस्करी होत असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान, अंबोलीत बिबट्या अवयव प्रकरणाची वनाधिकार्‍यांनी गंभीर दखल घेतली आहे. चौघा संशयितांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाने तपासाची चक्रे फिरविली आहे. या संशयितांच्या मोबाइलमध्ये बिबट्याच्या अवयवाचे फोटो व काही व्हिडिओ आढळून आल्याचे समजते. संबंधित अवयव हस्तगत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button