नाशिक : अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती; आरक्षित जागांचे करणार सर्वेक्षण | पुढारी

नाशिक : अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती; आरक्षित जागांचे करणार सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या मालकीचे भूखंड सुरक्षित करण्याच्या आयुक्तांच्या सूचनेनंतर आता आरक्षित जागा व इमारतींचे विभागनिहाय सर्वेक्षण करण्याबरोबरच अतिक्रमणे होऊ नये याकरिता दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.

समितीच्या अहवालानंतर अतिक्रमणे उद्ध्वस्त केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. गंगापूर रोडवरील आनंदवली शिवारातील सर्व्हे क्रमांक 67 या महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर खासगी व्यावसायिकाने बांधकाम केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर याबाबतची पावले उचलण्यात आली आहेत. आनंदवली शिवारातील सर्र्व्हे क्रमांक 67 मध्ये महापालिकेच्या मालकीचा 11 गुंठे क्षेत्राचा भूखंड आहे. सातबारा उतार्‍यावरदेखील मनपाचे नाव लागले आहे.

महापालिकेच्या भूखंडाला लागून सर्र्व्हे क्रमांक 61 ब असून, 30 मीटर रुंदीच्या रस्त्यावर असलेला भूखंड रोड वायडिंगमध्ये गेला आहे. मात्र, असे असताना सर्र्व्हे क्रमांक 61 ब वर इमारत उभी करण्यात आली. त्यामुळे महापालिकेचे भूखंड असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेचे भूखंड सुरक्षित करण्यासाठी आयुक्तांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या मालकीच्या भूखंडाचे विभागनिहाय सर्वेक्षण करून 15 दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे ते तातडीने हटवावे त्याच्यानंतर अतिक्रमण होत असल्यास विभागीय अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल. महापालिकेच्या मालकीच्या भूखंडासह इमारती आदी भागांची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

पालिकेच्या भूखंडावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी दक्षता समितीचे गठण करण्यात आले आहे. समितीमार्फत प्राप्त अहवालानुसार कारवाई केली जाईल.
– करुणा डहाळे, अतिक्रमण उपआयुक्त, महापालिका

हेही वाचा :

Back to top button