नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग… | पुढारी

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन, असा असेल मार्ग...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध नसल्याने मंडळांसह भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गणेशोत्सवाच्या सुरुवातीस मिरवणूक मार्गाची पाहणी केल्यानंतर गणेशोत्सव मंडळांशी चर्चा केली होती. त्यानुसार गणेश विसर्जन मिरवणुकीचे नियोजन पोलिसांनी सुरू केले आहे. शहरातील वाकडी बारव ते पंचवटी या मुख्य विसर्जन मार्गासह नाशिकरोड भागात दोन मिरवणूक मार्ग पोलिसांनी जाहीर केले आहेत. देवळाली कॅम्प भागातही स्वतंत्र मिरवणूक राहणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सव निर्बंधमुक्त राहणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह नागरिकांना आनंद झाला. मात्र, विसर्जन मिरवणुकीत डीजे लावण्यास परवानगी नसल्याने मंडळांचा काहीसा हिरमोड झाला. तरीदेखील यंदाच्या गणेशोत्सवात पाच दिवस रात्री 12 पर्यंत देखावे सुरू ठेवण्यासोबत ध्वनिक्षेपक वाजवण्यास परवानगी दिल्याने दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्याचप्रमाणे येत्या शुक्रवारी (दि.9) विसर्जन मिरवणुकीच्या वेळीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे चोख नियोजन केले आहे. सर्व विसर्जन स्थळांच्या परिसरात ‘नो व्हेइकल झोन’ असेल. यामुळे मंडळांना मिरवणुकीचे नियोजन त्यानुसार करावे लागेल, असे पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांना सांगितले आहे.

मार्गातील अडथळे दूर
मनपाच्या वतीनेही शहरातील पारंपरिक मिरवणूक मार्गातील अडथळे दूर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मिरवणूक मार्गात अडथळा ठरणार्‍या काही वृक्षांच्या फांद्याही छाटण्यात येत आहेत. तसेच छोटी-मोठी अतिक्रमणेही काढली जात आहेत.

भाविकांना महत्त्वाच्या सूचना
मिरवणुकीत गणेशभक्तांनी लहान मुला-मुलींचा हात सोडू नये. शक्यतो, त्यांच्या गळ्यात ओळखपत्र ठेवावे.
गर्दीत दागदागिन्यांचा वापर करणे टाळावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास ‘112’ क्रमांकावर संपर्क साधावा.
विसर्जनप्रसंगी खोल पाण्यात जाण्यास मनाई असून, गणेशभक्तांनी लहान
मुलांना पाण्यापासून दूर ठेवावे.
विसर्जन मिरवणुकीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहनांचा वापर करावा.

 

असे आहेत शहरातील गणेश विसर्जन मार्ग

मुख्य विसर्जन मार्ग : चौक मंडईतून वाकडी बारवमार्गे कादर मार्केट, फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नर, गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून म्हसोबा महाराज पटांगणाकडे मिरवणूक जाणार आहे.
नाशिकरोड-उपनगर : मार्ग 1 : नाशिकरोड येथील बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक, नाशिकरोड रेल्वेस्थानक चौक, सत्कार पॉइंटमार्गे श्रीराम मंदिर, देवळाली गावातून वालदेवी नदीपर्यंत मिरवणूक असेल.
मार्ग 2 : बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक कोठारी कन्या शाळा, करन्सी नोटप्रेस, मध्यवर्ती कारागृह, पाण्याची टाकी, शिवाजीनगरमार्गे दसक घाटापर्यंत पोहोचेल.
देवळाली कॅम्प : संसरी नाक्यापासून सुरू होणारी मिरवणूक सिलेक्शन कॉर्नर, जुने बसस्थानक, झेंडा चौक, हॉटेल शारदा, हनुमान मंदिरापासून पुन्हा जुने बसस्थानक, संसरी नाक्यावरून संसरी गावातून दारणा नदीकडे मार्गस्थ होईल.

हेही वाचा :

Back to top button