Nashik Malegaon : अन्यथा वाहनांच्या चाकांची हवा सोडणार; माजी आमदार शेख यांचा इशारा | पुढारी

Nashik Malegaon : अन्यथा वाहनांच्या चाकांची हवा सोडणार; माजी आमदार शेख यांचा इशारा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
शहरातून जाणार्‍या जुन्या आग्रा रस्त्याला अवजड वाहनांच्या बेशिस्त पार्किंगचा विळखा पडला आहे. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर मालट्रक, ट्रॅव्हल्स, ट्रॅक्टर्स आदी वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा आणि अपघातांना निमंत्रण मिळत आहे. परंतु, त्याकडे प्रशासन डोळेझाक करीत असल्याने मालेगाव महानगर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली असून, बेशिस्त वाहनचालकांना हारगुच्छ आणि वाहनांवर फुलांच्या माळा टाकून गांधीगिरी केली. गणपती विसर्जनापूर्वी मनपा, वाहतूक नियंत्रण शाखा आणि ‘आरटीओ’ने ही समस्या निकाली काढावी अन्यथा वाहनांची हवा काढो मोहीम राबवण्याचा इशारा महानगर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी दिला आहे.

गिरणा पूल ते दरेगाव नाका या पाच किलोमीटर अंतराचा रस्ता दुतर्फा एकप्रकारे पार्किंग झोन झाला आहे. दिवसरात्र मोठ्या वाहनांची भाऊगर्दी पाहायला मिळते. मोतीबाग नाका, निसर्ग परिसर, मोसम चौक, शिवतीर्थ, उड्डाणपूल, नवीन बसस्थानक, पिवळापंप, जाफरनगर, सखावत हॉटेल ते दरेगाव या भागात शेकडो वाहन नेहमी उभी असतात. परिणामी, जुना आग्रा रोड अरुंद होऊन वाहतूक मंदावते. त्यातून अपघात घडतात. वर्षानुवर्षे ही परिस्थिती असताना प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने गांधीगिरी सुरू केली आहे. वाहनचालकांना त्यांच्या या कृतीमुळे होत असलेल्या गैरसोयीची जाणीव करून देण्यात आली.

माजी आमदार शेख यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात बेशिस्तपणे वाहने उभ्या केलेेल्या चालकांना पुष्पहार घालून, त्यांच्या वाहनांवर झेंडूच्या फुलांच्या माळा टाकून बेपवाईचा निषेध करण्यात आला. दरेगाव ते शिवतीर्थापर्यंत हे अनोखे आंदोलन झाले. त्यात माजी नगरसेवक रियाज अली, शफीक अहमद, नदीम फल्लीवाला, अजहर शेख, कामरान शेख, शेख दानिश, अब्दुल कादीर, कलीम चायपत्तीवाला, अकलाख शाह, अब्दुल अहमद, निसार शेख, मोहम्मद आसिफ, इरफान खान आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रवेशबंदी कागदावरच
मालेगावात यंत्रमाग आणि प्लास्टिक उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. कच्चामाल आणि पक्क्या मालाची वाहतूक ही मालट्रकनेच होते. परिणामी, शहरात ट्रान्स्पोर्ट व्यवसाय वाढला आहे. परंतु, शहरात कुठेही ट्रक टर्मिनस नाही. कारखानेदेखील रहिवासी वस्तीत असल्याने त्या ठिकाणी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नाही. यातून प्रमुख मार्ग आणि चौकांची जागा हे ट्रकचालक पटकावतात. त्यातून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते. शहरात सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी केलेली असली तरी त्याच्या अंमलबजावणीला मुहूर्त लागलेला नाही.

Back to top button