नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

नाशिक : शहरात दरवर्षी 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर

Published on

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ
नाशिक शहराचा होणारा विकास पाहता शहराचा सर्वच बाजूंनी विस्तार होत आहे. नवनवीन कॉलनी आणि वसाहतींची भर पडत आहे. केवळ नागरी वसाहतच नव्हे, तर शिक्षण, मेडिकल, औद्योगिक या क्षेत्रांचाही विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. सर्व क्षेत्रांतील उपयोगिता वाढत असल्याने निर्माण होणार्‍या कचर्‍याच्या प्रमाणातही वाढ होत असून, दरवर्षी नाशिक शहरात 50 मेट्रिक टन कचर्‍याची भर पडत आहे.

नाशिक शहराची 'मंत्रभूमी ते तंत्रभूमी' अशी ओळख आहे. पर्यटनाबरोबरच सातपूर, अंबड या दोन ठिकाणी मोठ्या औद्योगिक वसाहती असल्याने शहर विकासाच्या अनुषंगाने मोठे महत्त्व आहे. आता नाशिक शहर हे केवळ दोन बाबींपुरते शिल्लक राहिलेले नाही. या आधी नाशिककरांना उच्च शिक्षण असेल किंवा गंभीर आजारांसाठी मुंबई-पुणे तसेच इतर महानगरांमध्ये धाव घ्यावी लागत असे. परंतु, गेल्या आठ-दहा वर्षांची स्थिती पाहिल्यास नाशिक शहर हे आता एज्युकेशन, हॉटेलिंग आणि मेडिकल हब म्हणूनही पुढे येऊ पाहत आहे. माहिती-तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कंपन्यांचीही नाशिकमध्ये रेलचेल पाहावयास मिळत आहे. यामुळे विकासाच्या मार्गावर असलेल्या नाशिक शहराच्या आजुबाजूला मोठमोठ्या वसाहती निर्माण झाल्या आहेत. पाथर्डी शिवार, आडगाव, मेरी-म्हसरूळ, मखमलाबाद, बारदान फाटा अशा विविध ठिकाणी गृहप्रकल्प उभे राहत असल्याने नागरी वसाहतींमध्ये मोठी भर पडली आहे. यामुळे साहजिकच त्या तुलनेत नाशिक महापालिकेवर सेवा सुविधा पुरविण्यासाठीचा भार वाढला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठ वर्षांची आकडेवारी पाहिल्यास नाशिकमध्ये कचर्‍याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. कचर्‍याचे प्रमाण वाढले याचाच अर्थ नागरी वसाहती, कारखाने, मेडिकल, महाविद्यालये आणि हॉटेलिंग यामध्येदेखील वाढ होत असल्याचाच तो भाग म्हणता येईल. कचर्‍याच्या वाढत्या प्रमाणात ओला आणि सुका कचर्‍याचे प्रमाणही अधिक आहे. त्यातही सुक्या कचर्‍याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी दिली.

274 घंटागाड्यांव्दारे दररोज संकलन

शहरातून 274 घंटागाड्यांव्दारे दररोज संकलित होणारा कचरा विल्होळीलगत असलेल्या मनपाच्या खत प्रकल्पावर नेला जातो. तिथे त्यावर प्रक्रिया होऊन त्यापासून खतनिर्मितीबरोबरच वीज, डिझेल आणि कांडी कोळसा अशा वस्तूंची निर्मिती केली जाते. यामुळे कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची योग्य व्यवस्था असल्याने शहरात कचर्‍याचे ढीग आढळून येत नाहीत. काही ठिकाणी अजूनही 'ब्लॅकस्पॉट' असले तरी ते कमी करण्यासाठी मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत.

15 ग्रॅमने वाढले दरडोई कचर्‍याचे प्रमाण

2015 मध्ये कचर्‍याचे प्रमाण 350 मेट्रिक टन होते. 2016 मध्ये 400, 2017 – 450, 2018 – 500, 2019 – 550, 2020 – 600 तर 2021 – 670 मे. टन इतके कचर्‍याचे प्रमाण आहे. 2015-16 मध्ये एका मनुष्याचे दरडोई कचरानिर्मितीचे प्रमाण हे 292 ग्रॅम इतके होते. तथापि, 2021-22 मध्ये कचरानिर्मितीचे प्रमाण 307 ग्रॅम इतके आहे. म्हणजेच दरडोई कचर्‍याच्या प्रमाणात 15 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. 2026 मध्ये मनपा क्षेत्रातून अंदाजे 822 मे. टन दैनंदिन केरकचरा संकलन होणे अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news