धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त | पुढारी

धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा

मध्य प्रदेशातून भिवंडीकडे जाणारा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे 20 लाख रुपये किमतीचा पानमसाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी धुळे तालुक्यातील सरवड फाट्याजवळ सापळा रचला होता. एमपी 09 जीएच ८६९१ क्रमांकाच्या ट्रकला थांबवून त्याची चौकशी केली असता, चालक बहादूर अंबाराम मावी आणि कमल रमेश डांगी या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली होती. ट्रकमध्ये वेगवेगळा माल भरला असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र, पोलिस पथकाला संशय आल्याने त्यांनी ट्रकमधील मालाची तपासणी केली असता, त्यांना ट्रकमध्ये 20 लाख 47 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित पानमसाला आढळून आला. पोलिसांनी चालक आणि सहचालक या दोघांना अटक केली आहे. हा गुटखा मध्य प्रदेशातील इंदूर येथून भिवंडी येथील व्यापाऱ्याला देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक तपासात उपलब्ध झाल्याने आता गुटख्याची तस्करी करणाऱ्या या व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यासाठी पोलिस पथकाने हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा:

Back to top button