Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार | पुढारी

Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘तुमच्या अंगावर एवढे सोने का घातले आहे? सध्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे, मी पोलिस इन्स्पेक्टर आहे’ असे सांगून दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरील 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शांतीलाल चुनीलाल मुथ्था (85, रा. कडवेनगर, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते गुरुवारी (दि.25) सकाळी साडेदहा वाजता फळ खरेदी करण्यासाठी पाथर्डी फाटा येथे जात होते. सकाळी 11 वाजता सप्तशृंगी रुग्णालयालगतच्या रस्त्यावर मुथा उभे होते. त्यावेळी दुचाकीवरून एक इसम आला व मुथा यांच्याजवळ थांबला. अंगावर इतके सोने का घातले, चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. सोने काढून रुमालात ठेवा, असे सांगितले. त्यामुळे मुथा यांनी भामट्यास त्याची ओळख विचारली. त्यावर मी पोलिस आहे, असे भामट्याने सांगितले. मुथा यांना विश्वास पटला नाही. त्यामुळे त्याने पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवले. दरम्यान, पाथर्डी फाट्याच्या रस्त्याने दुसरा इसम पायी चालत आला. त्यानेसुद्धा अंगावरील सोन्याचे दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. मुथा यांच्याकडे हातरुमाल नसल्याने, भामट्यांनी त्यांना रुमाल देत दागिने व्यवस्थित ठेवून देतो, असे सांगितले. त्यानुसार मुथा यांनी त्यांच्याकडील तीन अंगठ्या व गळ्यातील सोन्याची चेन काढून भामट्यांकडे दिली. दागिने मिळताच दोघे भामटे दुचाकीवरून फरार झाले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button