
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीच्या कामांमुळे थंडावलेली करवसुली मोहीम महापालिका येत्या 15 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू करणार आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी डिसेंबर 2022 पर्यंत घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश कर आकारणी विभागाला दिले आहेत. त्यानुसार करवसुली विभागाने बड्या थकबाकीदारांची यादी तयार केली असून, करवसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बडविण्यात येणार आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार-पाच महिन्यांपासून विविध स्वरूपाची कामे सुरू असून, त्यासाठी कर आकारणी विभागातील कर्मचार्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरपट्टी व पाणीपट्टी बिले वाटप आणि करवसुली या दोन्ही बाबी ठप्प झाल्या आहेत. परंतु, आता निवडणुकीसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू असल्याने कर आकारणी विभागाचे कर्मचारी पुन्हा करवसुलीच्या कामांना जुंपण्यात आले आहेत. आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. सहाही विभागांतील बड्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून, एक लाख लाखापेक्षा अधिक थकबाकी असलेले 3245 थकबाकीदार आहेत. बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. येत्या 15 सप्टेंबरपासून थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोल वाजविण्यात येणार आहे.
घरपट्टी वसुलीसाठी 150 कोटींचे उद्दिष्ट असून, त्यापैकी 87 कोटी 36 लाखांची वसुली झाली आहे. घरपट्टीच्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण खूप कमी आहे. पाणीपट्टीसाठी 75 कोटी उद्दिष्ट आहे. त्यापैकी 15 कोटी 91 लाख जमा झाले आहेत. आता वसुलीच्या दृष्टीने आयुक्तांच्या आदेशानंतर पाणीपट्टीचे देयक वाटप सुरू झाले आहे.