नाशिक : कारवाईच्या शॉकने घरोघरी अचूक वीजबिले | पुढारी

नाशिक : कारवाईच्या शॉकने घरोघरी अचूक वीजबिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वीजमीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या एजन्सींविरोधात महावितरणने कारवाईचा बडगा उगारताच वीजमीटर रीडिंगमधील अस्पष्ट फोटोचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ३ टक्क्यांपर्यंत कमी झाले. यादरम्यान, राज्यातील ७६ मीटर रीडिंग एजन्सींजना बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या ४१ अभियंत्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

राज्यभरातील वीज ग्राहकांना चांगली सेवा देण्यासह महसूल वाढीसाठी महावितरणने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून वीजमीटरचे रीडिंग अचूक राहावे यासाठी महावितरणने धडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनात अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे याप्रकारे मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला. त्याचा फायदा म्हणजे अचूक बिलांचे प्रमाण वाढताना एप्रिल ते जून या तीन महिन्यांत वीजविक्रीतही तब्बल तीन टक्क्यांची (८२५ दलयू) वाढ झाली. तसेच चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप दूर झाला आहे. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलिंगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्या अनुषंगाने वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाही, तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची समजदेखील या एजन्सींजना दिली जात असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

तक्रारींमध्ये झाली घट : महावितरणने मीटर रीडिंग एजन्सीवर कारवाईचा बडगा उगारल्याने राज्यभरात बिलिंग व रीडिंग प्रक्रियेमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी महावितरणकडून काळजी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button