नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला | पुढारी

नाशिक : स्वाइन फ्लूच्या संसर्गाने 11 जणांचा बळी, धोका वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने उपनगर येथील महिलेपाठोपाठ शहरात गुरुवारी (दि.18) आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली असून, जिल्ह्यात ग्रामीण भागातही चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पालघरमधील एक तर नगरमधील तीन रुग्णांचादेखील मृत्यू झाला असून, त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. शहरातील स्वाइनफ्लू बाधितांचा आकडा 94 इतका झाला असून, एकूण 11 मृत्यू झाले आहेत.

कोरोना महामारीतून नागरिकांना दिलासा मिळत नाही तोच पावसाळ्यात डेंग्यू, स्वाइन फ्लू तसेच चिकनगुणिया या आजारांचेही संकट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. जूनपासून स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. जानेवारी ते एप्रिलपर्यंत शहरात एकही रुग्ण आढळला नव्हता. पावसाळा सुरू होताच जून महिन्यात स्वाइन फ्लूचे दोन रुग्ण आढळले. जुलै महिन्यात रुग्णांची संख्या 28 झाली. ऑगस्ट महिन्याच्या 18 दिवसांतच स्वाइन फ्लूचा उद्रेक पाहायला मिळत असून, बाधितांचा आकडा 64 वर गेला आहे. तीन वर्षांनंतर नाशिकमध्ये स्वाइन फ्लूच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. उपनगरमधील एका 47 वर्षीय महिलेपाठोपाठ गुरुवारी (दि.18) पुन्हा स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला. राजीवनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याची नोंद मनपाच्या वैद्यकीय विभागाकडे झाली आहे. तसेच सिडकोतील राणेनगरमधील एका 57 वर्षीय महिलेचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे.

धोका वाढला, यंत्रणा सतर्क
नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूचा धोका वाढत चालला आहे. यामुळे आरोग्य वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. उपाययोजना करण्याबरोबरच नागरिकांनी घरात तसेच घराबाहेर कुठे पाण्याचे साठे निर्माण करू नये. पाणी साठे असल्यास ते नष्ट करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा :

Back to top button