नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक | पुढारी

नाशिक : पंधरा दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत, चोरट्यांना अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील नाशिकरोड पोलिसांनी चार सराईत चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 15 दुचाकींसह साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दुचाकी चोरट्यांसंदर्भात गुन्हे शोध पथकाचे अंमलदार व दुचाकी चोरी प्रतिबंध पथकातील कर्मचारी यांनी संयुक्तपणे माहिती काढून नीलेश ऊर्फ विकी पुंडलिक चव्हाण (रा. भोसरी, पुणे) यास ताब्यात घेतले.

त्याची अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार योगेश शिवाजी दाभाडे (रा. सातपूर) व जगदीश बाळू पाटील (रा. अशोकनगर, सातपूर) यांच्या मदतीने नाशिकरोड, आडगाव, मालेगाव, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, खेड या ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एकूण सात गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत. यातील मुख्य संशयित योगेश दाभाडे हा असून, दुचाकी चोरीचे त्याच्यावर 18 गुन्हे आहेत तर नीलेश ऊर्फ विकी पुंडलिक चव्हाण याच्यावरसुद्धा सहा गुन्हे दाखल आहेत.

त्याचप्रमाणे नाशिकरोड गुन्हे शोध पथकाचे पोलिस अमलदार रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना सिन्नर फाटा परिसरात दोन इसम संशयितरीत्या फिरत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव विचारले असता अमोल अशोक विनकरे (रा. श्रमिकनगर झोपडपट्टी, जेलरोड) तर दुसरा विधी संघर्षित बालक असून, या दोघांकडूनही दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून उपनगर व पंचवटी पोलिस ठाण्याचे गुन्हे उघडकीस करण्यात आले आहेत.

या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पोलिस निरीक्षक गणेश नायदे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकाचे अनिल शिंदे, अविनाश देवरे, अविनाश जुंद्रे, मनोहर शिंदे, राकेश बोडके, केतन कोकाटे, कुंदन राठोड, समाधान वाजे, विशाल कुंवर, महेंद्र जाधव, अजय देशमुख, सागर अडणे, सोमनाथ जाधव, योगेश रानडे, विनोद लखन, किरण गायकवाड, शरद झोले, स्वप्निल जुंद्रे, मुश्रीफ शेख, अनंत महाले, तुकाराम जाधव, या सर्वांचा सत्कार केला.

Back to top button