शिवसेना आणखी एक ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार : संजय राऊत | पुढारी

शिवसेना आणखी एक ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार : संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी काढलेल्या वादग्रस्त विधानामुळे शिवसेना-भाजपमधील राड्याची घटना ताजी असताना, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी त्या घटनेचा संदर्भ देत आणखी एखादा ‘करेक्ट कार्यक्रम’ करू, असे सांगत भाजपला इशारा दिला आहे.

येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधताना ते म्हणाले, कार्यक्रम

करण्याची शिवसेनेला सवय आहे. राज्यात प्रदीर्घ काळ शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील. महाराष्ट्रासारखे राज्य आपल्या हाती असल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे. त्यांनी आमच्याकडे यावे आम्ही उपचार करू. ठाकरेंच्या रक्तातच समाजकारण, राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली, हे सांगण्याची गरज नाही.

शिवसेनेचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत, वैर नाही. परंतु, राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कारण आमच्याकडे राजकारणातून उचलायला खांदे आणि हात कमी नाहीत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी शहाण्यासारख्या जनआशीर्वाद यात्रा काढल्या. मात्र एक अतिशहाणा ऊठसूठ ठाकरे, महाविकास आघाडीवर टीका करत आहे.

वारंवार होणार्‍या वादग्रस्त विधानांमुळे उद्धव ठाकरे यांनी त्या अतिशहाण्याला लगाम लावला, असे खा. राऊत म्हणाले. कुंडल्या बाहेर काढण्याची धमकी देणार्‍या राणे यांच्यावर इशाराच्या पार्श्वभूमीवर ‘आमच्याकडे तुमच्या कुंडल्या नाहीत का, असा प्रश्न करत आमची संदूक उघडी करू, तेव्हा काय होईल, याचा विचार करा, असा प्रतिइशारा खा. राऊत यांनी दिला.

Back to top button